
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) : न्यायिक सेवेतील वाढता ताण, जबाबदाऱ्या आणि कार्यक्षमतेचा समतोल राखण्यासाठी मानसिक आरोग्य सुदृढ असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले.हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विशेष मानसिक आरोग्य कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण या उक्तीचा उल्लेख करत मन प्रसन्न, सकारात्मक आणि संतुलित ठेवणे हे यशस्वी जीवनाचे तसेच कार्यक्षम सेवाभावाचे मूळ असल्याचे सांगितले.
न्यायिक सेवेत काम करताना निर्माण होणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीत मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आणि संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दैनंदिन कामकाजात मानसिक संतुलन राखल्यास निर्णयक्षमता, कार्यक्षमता आणि वैयक्तिक आयुष्य अधिक समृद्ध होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनस्वी कोटकर आणि मानसशास्त्रज्ञ श्रेष्ठा शरोन यांनी न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
कामातील ताणतणाव व्यवस्थापन, कार्य-जीवन समतोल, ध्यान-धारणा, चिंता, नैराश्य, व्यसनाधीनता, झोपेच्या समस्या तसेच व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली.
सातत्याने काम केल्यामुळे निर्माण होणारा मानसिक व शारीरिक थकवा दूर करण्यासाठी योग्य विश्रांती, विरंगुळा आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेतील मार्गदर्शनाचे उपस्थित न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मानसिक स्वास्थ्य जपण्यास मोठी मदत होत असून भविष्यातही अशा कार्यशाळांचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस. एस. पळसुळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. एम. मानखैर यांनी केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis