


रायगड, 21 जुलै (हिं.स.) नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चिकन-मटण मार्केटमधील 21 गाळे अनेक वर्षांपासून रिकामे असून त्यांचे नियमानुसार वाटप न झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत मुजम्मील मनीयार यांनी ग्रामविकास अधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच मार्केटसमोरील अनधिकृत टॅक्सी पार्किंग तात्काळ हटविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीने गाळे वाटपासाठी अर्जदारांकडून प्रत्येकी 100 रुपये अर्ज शुल्क स्वीकारले होते. मात्र अनेक वर्षे उलटूनही गाळ्यांचे वाटप करण्यात आले नाही किंवा कोणताही भाडेकरार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्जदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय मार्केटसमोर अनधिकृतपणे टॅक्सी पार्किंग सुरू असून तेथे रेलिंग आणि पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. सार्वजनिक जागेवर हे बांधकाम कोणत्या परवानगीने करण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत नेरळ गावात आवश्यक परवाने न घेता सुरू असलेल्या चिकन-मटण व्यवसायांची तपासणी करून संबंधित व्यावसायिकांना नियमानुसार परवाने देत ग्रामपंचायतीच्या रिक्त गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा महसूल वाढण्यास मदत होईल, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
या प्रकरणात रिक्त गाळ्यांमुळे झालेल्या महसुली नुकसानीचा हिशोब निश्चित करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अर्ज शुल्क घेऊनही गाळे वाटप न करण्यामागील कारणांची चौकशी करावी आणि संपूर्ण चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशा प्रमुख मागण्या तक्रारीत करण्यात आल्या आहेत. या तक्रारीमुळे नेरळ ग्रामपंचायतीतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)