निफाड - देवगावच्या अंगणवाडीतील पोषण आहाराचे घेतले नमुने
मृत पक्षी आढळल्याने खळबळ; जिल्हा परिषद अधिकार्यांकडून पंचनामा निफाड, 21 जुलै, (हिं.स.)। निफाड तालुक्यातील देवगाव (ता. निफाड) येथील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात वितरित केलेल्या घरपोच पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याच्या गंभीर घटनेची दख
निफाड - देवगावच्या अंगणवाडीतील पोषण आहाराचे घेतले नमुने


मृत पक्षी आढळल्याने खळबळ; जिल्हा परिषद अधिकार्यांकडून पंचनामा

निफाड, 21 जुलै, (हिं.स.)। निफाड तालुक्यातील देवगाव (ता. निफाड) येथील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात वितरित केलेल्या घरपोच पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याच्या गंभीर घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, महिला व बालविकास अधिकारी कोंढार आणि बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.

येथील लाभार्थी प्रिन्स व गणेश सुखदेव माळी यांच्या कुटुंबाला 14 जुलैला पोषण आहाराचे पाकीट देण्यात आले होते. 18 जुलैला सकाळी त्यांची आई पूजा माळी यांनी आहार तयार करण्यासाठी पाकीट उघडले असता, त्यात मृत पक्षी आढळून आला. यानंतर माजी सरपंच विनोद जोशी, माजी सरपंच वैशाली अडांगळे, प्रशांत कुलकर्णी, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिक-यानी या पोषण आहाराचा रीतसर पंचनामा केला. सदर तूरडाळ-तांदूळ रिमिक्स पाकिटावर उत्पादन दि. 11 जून 2026 व बॅच क्रमांक एम.डी.के.-बी 02-06 अशी नोंद आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देवगावमधील सर्व अंगणवाडी केंद्रांतील शिल्लक आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार असून, तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande