
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) :राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, विधवा तसेच पाल्य यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असल्यास त्यांना या पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
याशिवाय उद्योग, संगणक क्षेत्र तसेच पूर, अग्नितांडव, अपघात यांसारख्या आपत्तीच्या काळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींनाही या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप
राष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी : 25 हजार रुपये
आंतरराष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी : 50 हजार रुपये
दहावी व बारावी परीक्षेत 90/85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या पाल्यांसाठी : 20 हजार रुपये
पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांसाठी : 25 हजार रुपये
आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या पाल्यांसाठी : 1 लाख रुपये
पात्र व इच्छुक व्यक्तींनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे 20 सप्टेंबरपर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 0240-2370313
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis