
रत्नागिरी, 21 जुलै (हिं.स.) । येथील स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० जून ते २० जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संस्थेच्या विविध ठेव योजनांमध्ये ३४ कोटी १९ लाख रुपयांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. त्यामध्ये २,२२५ नव्याने जमा झालेल्या ठेवींचा समावेश आहे. २६९ नवीन ठेवीदार संस्थेशी जोडले गेले.
ठेववृद्धी मासाच्या प्रारंभी संस्थेच्या एकूण ठेवी ४१४ कोटी रुपये होत्या. अवघ्या एका महिन्यात त्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन २० जुलैअखेर संस्थेच्या ठेवी ४४६ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. संस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये ठेववृद्धी मासाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पतसंस्था आता ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या महत्त्वपूर्ण टप्प्याकडे दमदार वाटचाल करत आहे.
संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा, आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवस्थापन आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस दृढ होत आहे. संस्थेची आर्थिक स्थितीही भक्कम असून ९९.७८ टक्के वसुली, शून्य टक्के एनपीए, २७ टक्के CRAR, २०० कोटी रुपयांची बँक गुंतवणूक आणि ३०७ कोटी रुपयांचे कर्जवाटप अशी उल्लेखनीय आर्थिक स्थिती संस्थेने कायम राखली आहे. या भक्कम आर्थिक पायावर आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेची प्रगती सातत्याने सुरू आहे, असे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, ठेवीदारांच्या विश्वासाचे जतन करणे आणि त्यांना सुरक्षित, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हीच संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ग्राहकांच्या या विश्वासाच्या बळावर स्वरूपानंद पतसंस्था ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या दिशेने वाटचाल करत असून, भविष्यातही संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला असाच उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी