आषाढी एकादशीनिमित्त अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा
अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर आणि नागपूर-मिरज या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या
आज पहिली पंढरपूर एक्सप्रेस नया अमरावती रेल्वे स्थानकावरून रवाना


अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर आणि नागपूर-मिरज या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.

नवी अमरावती येथून पंढरपूरकडे जाणारी विशेष रेल्वे गाडी क्रमांक 01119 मंगळवारी 21 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता रवाना झाली. आमदार रवी राणा यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही गाडी 21 आणि 24 जुलै रोजी नवी अमरावतीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

यावेळी आमदार रवी राणा यांनी वारकऱ्यांना विठ्ठलाचे रूप मानत त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण येथे येत असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध व्हावा, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांना बळ मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

या विशेष रेल्वेला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहिल्यानगर, दौंड आणि कुडुवाडी यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजपकडून वारकऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी, पिण्याचे पाणी, चहा आणि छत्री वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वे स्थानक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande