
अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार व वॉटर कॅननच्या वापराच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. अमरावती शहरात युवक काँग्रेसने इर्विन चौकात रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तर चांदूरबाजार येथे प्रहार जनशक्ती पक्ष व सामान्य नागरिकांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अमरावती शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इर्विन चौकात रस्त्यावर ठिय्या देत विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध नोंदविला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून रास्ता रोको करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीला शोभणारा नाही. शिक्षण, रोजगार आणि न्याय्य हक्कांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे निषेधार्ह आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.दरम्यान, चांदूरबाजार शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थ्यांवर लाठी नको, न्याय द्या अशा घोषणांनी शहर दणाणून गेले.
मोर्चादरम्यान जंतर-मंतर येथील लाठीमाराची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याची पारदर्शक चौकशी तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा कथित अन्याय त्वरित थांबविण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दडपशाहीऐवजी संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन सरकारकडे केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी