
नंदुरबार, 21 जुलै (हिं.स.)। महसूल विषयक अडचणींचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि शासनाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात 22 आणि 23 जुलै 2026 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शिबिरांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानात नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी, प्रलंबित अर्ज आणि विविध सेवांचा तातडीने निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही शिबिरे उपयुक्त ठरणार आहेत.
शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित सेवा, तक्रार निवारण, अर्जांची छाननी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. अकृषक रूपांतरण प्रक्रिया, सनद प्रणालीतील सुधारणा, तुकडेबंदी कायद्यातील बदल आणि अभिलेख आधुनिकीकरणाबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरांचे आयोजन 22 जुलै रोजी अक्कलकुवा, शहादा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघांत, तर 23 जुलै रोजी नवापूर विधानसभा मतदारसंघात करण्यात येणार आहे.
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरस्थळी उपस्थित राहून महसूल विषयक प्रलंबित प्रश्न व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर