
जळगाव,, 21 जुलै (हिं.स.) महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली असून दि. १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन पूरक पत्राद्वारे योजनेच्या निकषात बदल करून काही अटी वगळल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकची नोंदणी केलेली नाही, त्यांनी अॅग्रीस्टॅकची नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.
पत्रकात नमूद केल्यानुसार, शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना २०२२ जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे.जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, जळगाव बँक विकास संस्थामार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देण्यात आले असून जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विकास संस्थांचे या योजनेअंतर्गत एकूण ६३,५११ सभासदांची ६३,५११ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकांची २६,६१४ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र/सेतू कार्यालय येथे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची कर्जखाती आधार कार्डशी जोडलेली नाहीत त्यांनी तात्काळ कर्जखाती व आधार जोडणी करून घ्यावी. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त होताच गावातील तलाठी, ग्रामसेवक व संस्थेच्या सचिवामार्फत गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच बँकांच्या शाखेमध्येही यादी प्रसिद्ध केली जाईल.
शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये वा रकमेमध्ये काही विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावरच विसंगतीबाबतची नोंद पोर्टलवर करणे आवश्यक आहे. विसंगती दुरुस्ती झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर