
रत्नागिरी, 21 जुलै (हिं.स.) । येथील भारत शिक्षण मंडळ संचालित देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत नाचणे येथील हवामान केंद्राला शैक्षणिक भेट देण्यात आली. या भेटीत प्रथम व तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हवामान केंद्रातील तज्ज्ञ अधिकारी राजेश सोनार यांनी तापमापक, पर्जन्यमापक, वायुदाबमापक, वाऱ्याचा वेग व दिशा मोजणारी उपकरणे तसेच इतर हवामान निरीक्षण साधनांची माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दिले. हवामान माहिती संकलन, विश्लेषण आणि अंदाज तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना हवामानशास्त्राच्या संकल्पना समजल्या. भूगोल विषयाविषयीची आवड अधिक वाढली. या उपक्रमाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड व सहायक प्रा. वैष्णवी शेवडे यांनी केले. उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी