इराणकडून जॉर्डन-कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा दावा
तेहरान, 23 जुलै (हिं.स.)।इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) आणि इराणी सैन्याने गुरुवारी कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेकडून सातत्याने ह
इराणकडून जॉर्डन-कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा दावा


तेहरान, 23 जुलै (हिं.स.)।इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) आणि इराणी सैन्याने गुरुवारी कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम संस्था ब्रॉडकास्टिंगच्या वृत्तानुसार, आयआरजीसी ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर तीव्र हल्ले करून अमेरिकेच्या THAAD क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा रडार नष्ट करण्यात आला. अमेरिकन हल्ल्यांना आपण सातत्याने प्रत्युत्तर देत राहू, अशी भूमिका इराणने यापूर्वीही घेतली आहे. आयआरजीसीच्या दाव्यानुसार, या हल्ल्यांमध्ये पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, C-RAM रडार तसेच अमेरिकन तळावरील इंधन टाक्यांचे नुकसान करण्यात आले. याशिवाय हेलिकॉप्टर उपकरणांचे मोठे गोदाम, तसेच हेलिकॉप्टर दुरुस्ती व देखभाल केंद्रही उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

जॉर्डनच्या जनतेला उद्देशून आयआरजीसी ने म्हटले की, इराण जॉर्डनच्या सार्वभौमत्वाचा आणि भौगोलिक अखंडतेचा आदर करतो. मात्र, जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांची उपस्थिती हीच जॉर्डनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे, “आमच्या देशावर हल्ला करणाऱ्यांना आणि आमच्या मुलांची हत्या करणाऱ्यांना ते जिथून हल्ला करतील तिथेच प्रत्युत्तर देणे हा आमचा कायदेशीर, धार्मिक आणि नैतिक अधिकार आहे.”

दरम्यान, इराणी सैन्याने ‘ऑपरेशन लाइटनिंग’च्या २३व्या टप्प्याची घोषणा करत ड्रोन हल्ल्यांद्वारे कुवेतमधील अमेरिकेच्या तीन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इराणी सैन्याच्या जनसंपर्क विभागानुसार, या हल्ल्यांमध्ये दोहा बेसवरील दारूगोळा आणि रसद साठे, अली अल सालेम तळावरील इंधन टाक्या आणि अरिफजान कॅम्पमधील दारूगोळा साठा लक्ष्य करण्यात आला.

सैन्याच्या निवेदनात म्हटले आहे, “आमच्या देशाविरुद्ध शत्रूकडून सुरू असलेल्या आक्रमकतेला उत्तर म्हणून ऑपरेशन लाइटनिंगच्या २३व्या टप्प्यात काही तासांपूर्वी शक्तिशाली ड्रोन हल्ले करण्यात आले.” आयआरजीसी ने आणखी एका निवेदनात म्हटले की, कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळावरील अमेरिकन लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात लष्करी उपकरणांचे गोदाम, पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि MQ-9 ड्रोनचे हँगर नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच अमेरिकन सैनिकांच्या निवासस्थानी, अल-अदिरी बॅरेकमधील हेलिकॉप्टर हँगर आणि संचार हँगरलाही लक्ष्य करण्यात आल्याचे आयआरजीसी ने सांगितले.

कुवेतच्या जनतेला उद्देशून आयआरजीसी ने म्हटले की, ही कारवाई कुवेतच्या सार्वभौमत्वाविरोधात नसून केवळ अमेरिकन लष्करी ठिकाणांविरोधात आहे.निवेदनात म्हटले आहे, “तुमच्या भौगोलिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन अमेरिकेने केले आहे, आम्ही नाही. आम्ही फक्त त्या ठिकाणांवर हल्ले करत आहोत जिथे अमेरिकन सैन्य तैनात आहे.”

हा घटनाक्रम अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने बुधवारी जाहीर केले की त्यांनी इराणविरोधातील सलग १२व्या रात्रीची लष्करी कारवाई पूर्ण केली आहे.सेंटकॉम च्या निवेदनानुसार, २२ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता (अमेरिकन वेळेनुसार) इराणविरुद्धची सलग १२वी मोहीम पूर्ण करण्यात आली. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, या कारवाईत इराणची सागरी लष्करी क्षमता, क्षेपणास्त्र व ड्रोन साठे, किनारी देखरेख केंद्रे आणि हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यात आले.सेंटकॉम चा दावा आहे की, या हल्ल्यांमुळे इराणची व्यापारी जहाजे आणि नागरी नौकांवर हल्ले करण्याची क्षमता कमकुवत झाली आहे. याशिवाय, या महिन्यात अमेरिकेने इराणमधील डझनभर लष्करी ठिकाणांवर हल्ले केल्याचेही सांगितले.

तसेच, गेल्या महिन्यात दोन्ही देशांदरम्यान झालेला १४ कलमी सामंजस्य करार मोडीत निघाल्यानंतर इराणविरोधातील सागरी नाकेबंदी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत नऊ व्यापारी जहाजांचे मार्ग बदलण्यात आले असून एका जहाजाला निष्क्रिय करण्यात आले आहे, जेणेकरून कोणतेही जहाज इराणी बंदरांमध्ये प्रवेश करू शकणार नाही किंवा तेथून बाहेर पडू शकणार नाही.सेंटकॉम ने असेही म्हटले आहे की सध्या पश्चिम आशियात ५० हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक तैनात असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास ते सक्षम आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande