
परभणी, 23 जुलै, (हिं.स.)। विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातून देशप्रेम, धैर्य, शिस्त, आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील यांनी केले.नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या शिवाजीनगर शाखेत गुरुवारी (दि. 23) भारतीय भाषा सप्ताह आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अधोरेखित केले. प्लेगच्या साथीच्या काळात पुण्यातील जनतेच्या बाजूने उभे राहत त्यांनी ‘केसरी’मधून ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर केलेली टीका आणि मंडाले कारागृहात असताना लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी विशद केले.
या कार्यक्रमास सहपर्यवेक्षक सुनील रामपूरकर आणि प्रमुख वक्ते प्रदीप मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी संसदेचे सल्लागार श्रीपाद कुलकर्णी यांच्या मनोगताने झाली. त्यांनी भारतीय भाषा सप्ताहाचे महत्त्व विशद करत भारतीय भाषांची समृद्ध परंपरा, विविधता आणि संस्कृतीशी असलेले त्यांचे अतूट नाते विद्यार्थ्यांसमोर उलगडले. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून समाजाची ओळख, संस्कार आणि विचारांची वाहक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंग परंपरेपासून आधुनिक मराठी साहित्यापर्यंतचा प्रवास आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या योगदानाचा आढावा त्यांनी घेतला.
प्रमुख वक्ते प्रदीप मुळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या त्यांच्या घोषणेचा उल्लेख करत त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे केलेली जनजागृती, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजसंघटनासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. टिळकांच्या विद्यार्थी जीवनातील शेंगांच्या टरफलांचा प्रसिद्ध प्रसंग सांगताना त्यांनी टिळकांच्या सत्यनिष्ठ, निर्भीड आणि न्यायप्रिय स्वभावाचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीपाद कुलकर्णी, शिवप्रसाद कोरे, अभिजित कुलकर्णी, गोपाळ रोडे, सुनील तुरुक माने, वसंत पुरी, सुधाकर रेडगे, राजेश उपाडे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. भारतीय भाषांचा गौरव, मराठी साहित्याचा अभिमान आणि लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रभक्त विचारांच्या प्रेरणेने कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.स्वरा कुलकर्णीच्या एकपात्री नाटिकेने वेधले लक्ष... भारतीय भाषा सप्ताहानिमित्त इयत्ता आठवी ‘ब’ची विद्यार्थिनी स्वरा कुलकर्णी हिने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित प्रभावी एकपात्री नाटिका सादर केली. राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, संघर्ष आणि स्वराज्याचा विचार तिने आपल्या अभिनयातून प्रभावीपणे साकारला. तिच्या सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी देशभक्तिपर घोषणांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis