
बँकॉक, 23 जुलै (हिं.स.)।थायलंडच्या दक्षिणेकडील नाराथिवाट प्रांतात सुरक्षा तपासणी नाक्यावर झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात पाच सैनिकांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी प्रथम सुरक्षा चौकीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर पाईप बॉम्ब फेकून हल्ला चढवला. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
थायलंडच्या रॉयल आर्मीच्या इंटरनल सिक्युरिटी ऑपरेशन्स कमांड (आयएसओसी) च्या माहितीनुसार, हा हल्ला २२ जुलैच्या संध्याकाळी नाराथिवाट प्रांतातील रा-न्गे जिल्ह्यातील बुकेह सामी तपासणी नाक्यावर झाला. त्या वेळी ४५व्या रेंजर फोर्स रेजिमेंटचे जवान सुरक्षा ड्युटीवर तैनात होते. याच दरम्यान सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला.या हल्ल्यात सार्जंट मेजर फर्स्ट क्लास तीरायुत सोमाकर्ड, रेंजर स्वयंसेवक विमोल डाबथोंग, रेंजर स्वयंसेवक नट्टासित काओसेना, रेंजर स्वयंसेवक सोलाहुडिंग पी, रेंजर स्वयंसेवक जकारिया जे-ना हे शहीद झाले आहेत. आयएसओसीने सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, त्यांनी दक्षिण सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे.
हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना सी साखोन जिल्ह्यात एक वाहन सापडले असून, ते हल्ल्यात वापरण्यात आल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पुरावे नष्ट करण्यासाठी हल्लेखोरांनी त्या वाहनाला आग लावली होती. फॉरेन्सिक पथकाने हल्ल्याचे ठिकाण आणि जप्त केलेले वाहन या दोन्ही ठिकाणांहून पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आयएसओसीने सांगितले की, सेना, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, हल्लेखोरांना लवकरच अटक करून न्यायालयासमोर उभे केले जाईल.
नाराथिवाट, पट्टानी आणि याला हे थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांत अनेक वर्षांपासून फुटीरतावादी हिंसाचाराने प्रभावित आहेत. या भागांमध्ये सुरक्षा दलांवर तसेच सामान्य नागरिकांवर वेळोवेळी हल्ले होत आले आहेत. सरकारकडून सातत्याने सुरक्षा मोहिमा राबविल्या जात असल्या तरी हिंसक घटनांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode