
वॉशिंग्टन , 23 जुलै (हिं.स.) । जॉर्डनमधील एका लष्करी तळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन सैनिक अँजेला रामप्रसाद यांचा मृत्यू झाल्याची भीती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागॉन) व्यक्त करण्यात आली आहे. संरक्षण विभागाने सांगितले की, २५ वर्षीय आर्मी सार्जंट अँजेला रामप्रसाद यांचा १७ जुलै २०२६ रोजी जॉर्डनमधील मुवाफक साल्ती एअर बेसवर झालेल्या शत्रूच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा. या घटनेची चौकशी सध्या सुरू असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
पेंटागॉनच्या निवेदनानुसार, सुरुवातीला अँजेला रामप्रसाद यांना बेपत्ता घोषित करण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांची स्थिती “ड्यूटी स्टेटस – ठिकाण अज्ञात आणि मृत मानण्यात आले” अशी बदलण्यात आली.
अँजेला रामप्रसाद या गयाना येथून स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील बसदेव रामप्रसाद हे स्थानिक डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते असल्याचे सांगितले जाते. पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, त्या न्यूयॉर्क शहरातील क्वीन्स बरोमधील ओझोन पार्क परिसरातील रहिवासी होत्या. या भागात भारतीय वंशाच्या गयानावासी नागरिकांची मोठी वस्ती आहे.जर्मनीतील अन्सबाख येथे असलेल्या १०व्या आर्मी एअर अँड मिसाइल डिफेन्स कमांडमध्ये कार्यरत असलेल्या रामप्रसाद यांची जॉर्डनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्याच दरम्यान इराणने मुवाफक साल्ती एअर बेसवर ड्रोनद्वारे हल्ला केला.
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते पेसाच ओसिना यांनी अँजेला रामप्रसाद यांचे वर्णन “समाजासाठी खऱ्या अर्थाने एक अमूल्य देणगी” असे केले. ते म्हणाले की, त्यांना देशसेवा करायची होती, इतरांचे संरक्षण करायचे होते आणि धैर्य तसेच नम्रतेने आपले कर्तव्य पार पाडायचे होते.ओसिना यांनी एक्सवर लिहिले की, या दुर्दैवी घटनेनंतर ते अँजेलाचे वडील बसदेव रामप्रसाद, आई कॅरोल एसेवेडो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बुधवारी त्यांनी सांगितले की, या हल्ल्याची इराणला मोठी किंमत मोजावी लागेल. यापूर्वी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले होते की, इराणकडून जेव्हा एखाद्या अमेरिकी सैनिकाची हत्या केली जाते, तेव्हा त्याची अनेक पटींनी किंमत इराणला चुकवावी लागते. अँजेला रामप्रसाद यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाल्यास, त्या मुवाफक साल्ती एअर बेसवरील या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चौथ्या अमेरिकी सैनिक ठरतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode