
ढाका, 24 जुलै (हिं.स.)।बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाला अजून जवळपास दोन वर्षे शिल्लक असतानाच आज, शुक्रवारी राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी संसदाध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा सरकार त्यांच्या पदावर कायम राहण्याबाबत समाधानी नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांचे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चांगले संबंध असल्याचे मानले जात होते. बांग्लादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, शहाबुद्दीन यांनी अलीकडेच शेख हसीना यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे सरकार नाराज होते.
शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांग्लादेशात परतण्याची आणि वॉर क्राइम्स ट्रिब्युनलकडून दोषी ठरवल्यानंतर आत्मसमर्पण करण्याची घोषणा केल्यानंतर काहीच दिवसांत शहाबुद्दीन यांचा राजीनामा आला आहे. शहाबुद्दीन हे शेख हसीना यांचे जुने सहकारी असून, सध्या बंदी घालण्यात आलेल्या अवामी लीग पक्षाच्या तिकिटावर ते निवडणूक लढले होते. २०२३ मध्ये ते पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते.
२०२४ मधील जनआंदोलनानंतर शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्या आंदोलनानंतरही घटनात्मक पदावर कायम राहिलेले ते अवामी लीग सरकारमधील अखेरचे प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. शेख हसीना यांच्या संभाव्य पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सरकारकडून त्यासाठी तयारी सुरू असताना हा राजीनामा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
बांग्लादेशच्या राज्यघटनेनुसार, नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत संसदाध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळतील.राज्यघटनेच्या कलम ५४ नुसार, राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास किंवा राष्ट्रपती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ ठरल्यास, नवीन राष्ट्रपती निवडले जाईपर्यंत संसदाध्यक्ष कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode