५० टक्के शुल्क लागू झाल्यास कॅनडाकडून प्रत्युत्तराची तयारी- मार्क कार्नी
ओटावा, 24 जुलै (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या एका वक्तव्यामुळे अमेरिका आणि कॅनडा यांच्यात व्यापारयुद्ध (ट्रेड वॉर) भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी कार्नी यांनी सांगितले की, कॅनडा अमेरिकेसोबत व्यापक करार करण्यासाठी वेगान
५० टक्के शुल्क लागू झाल्यास कॅनडाकडून प्रत्युत्तराची तयारी- मार्क कार्नी


ओटावा, 24 जुलै (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या एका वक्तव्यामुळे अमेरिका आणि कॅनडा यांच्यात व्यापारयुद्ध (ट्रेड वॉर) भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी कार्नी यांनी सांगितले की, कॅनडा अमेरिकेसोबत व्यापक करार करण्यासाठी वेगाने चर्चा करत आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी प्रत्यक्षात आणली, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कॅनडा देखील तयार आहे. ट्रम्प यांनी गेल्या सोमवारी कॅनडावरील नव्या शुल्कांची घोषणा केली होती. ही शुल्कवाढ १९ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

प्रिन्स एडवर्ड आयलंडमधील चार्लोटटाउन येथे प्रांतीय प्रमुख आणि प्रादेशिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कार्नी म्हणाले, “जर हे शुल्क किंवा इतर निर्बंध लागू झाले, तर त्याला प्रतिसाद म्हणून आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.मार्क कार्नी यांनी स्पष्ट केले की, शुल्क लागू होण्यापूर्वी व्यापार करार झाला नाही, तर कॅनडासमोर सर्व पर्याय खुले राहतील. ते म्हणाले, “आम्हाला आधीच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. या टप्प्यावर आगाऊ प्रतिक्रिया देणे उलट परिणाम करणारे ठरू शकते.”

अमेरिकेच्या नव्या शुल्क धोरणात अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये मध, सिमेंट, मद्य, दुग्धजन्य पदार्थ, लाकडापासून बनवलेली काही उत्पादने, हॉकी स्टिक्स आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. मात्र, ऊर्जा उत्पादने, मासेमारीशी संबंधित उत्पादने, महत्त्वाची खनिजे आणि पोटॅश यांना या शुल्कातून वगळण्यात आले आहे.

तथापि, यामध्ये अशा वस्तूंचा समावेश असेल ज्यांना यापूर्वी युनायटेड स्टेट्स–मेक्सिको–कॅनडा करार (यूएसएमसीए ) अंतर्गत आयात शुल्कातून सूट देण्यात आली होती. अमेरिकेने २०२० मधील हा व्यापार करार नूतनीकरण न केल्याने दोन्ही देशांदरम्यान नव्या वाटाघाटींची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कॅनडातील प्रमुख वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या डेसजार्डिन्सच्या विश्लेषणानुसार, या शुल्कांचा थेट परिणाम अमेरिकेला होणाऱ्या कॅनडाच्या वार्षिक निर्यातीवर होईल.या शुल्कांमुळे कॅनडाला सुमारे १९.८ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान होऊ शकते. ही रक्कम अमेरिकेकडून दरवर्षी कॅनडातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या सुमारे ५ टक्के इतकी आहे.

दरम्यान, अमेरिकेने जगातील सुमारे ६० देशांवर अतिरिक्त शुल्क लादले आहे. भारतावरही १० टक्के अतिरिक्त आयात कर लागू करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande