
मुंबई, 24 जुलै, (हिं.स.)। रणबीर कपूर आणि यश यांची मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आणखी थोडा काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मूळतः २४ जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा ट्रेलर ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला. निर्माते नमित मल्होत्रा यांनी जाहीर केले की, चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी 'सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट'सोबत झालेल्या एका मोठ्या भागीदारीमुळे, आता हा ट्रेलर जागतिक स्तरावर एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल.
सोशल मीडियावर ही माहिती देताना नमित मल्होत्रा यांनी या भागीदारीचे वर्णन भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक टप्पा असे केले. त्यांच्या मते, 'रामायण' हा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील सर्वात मोठ्या चित्रपट प्रदर्शनांपैकी एक ठरणार आहे. त्यांनी सांगितले की, 'सोनी पिक्चर्स'सारख्या मोठ्या हॉलिवूड स्टुडिओच्या सहकार्याने, हा चित्रपट हॉलिवूडच्या मोठ्या 'ब्लॉकबस्टर' चित्रपटांना मिळणाऱ्या भव्यतेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केला जाईल.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'चा ट्रेलर सुरुवातीला 'सॅन डिएगो कॉमिक-कॉन'मधील चित्रपट टीमच्या सहभागानंतर २४ जुलैच्या सकाळी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता प्रदर्शनाची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल. भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांहून अधिक काळातील इतिहासातील हा एक अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगत, नमित मल्होत्रा म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि पौराणिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर