दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव; चीनकडून फिलिपिन्सच्या नौकांवर पाण्याचे फवारे
मनिला, 24 जुलै (हिं.स.)।फिलिपिन्सने शुक्रवारी सांगितले की, दक्षिण चीन समुद्रात चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजांनी त्यांच्या मत्स्य विभागाच्या दोन नौकांवर उच्च दाबाने पाण्याचे फवारे मारले. या आठवड्यात वादग्रस्त सागरी क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये झालेली
दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव; चीनकडून फिलिपिन्सच्या नौकांवर पाण्याचे फवारे


मनिला, 24 जुलै (हिं.स.)।फिलिपिन्सने शुक्रवारी सांगितले की, दक्षिण चीन समुद्रात चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजांनी त्यांच्या मत्स्य विभागाच्या दोन नौकांवर उच्च दाबाने पाण्याचे फवारे मारले. या आठवड्यात वादग्रस्त सागरी क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये झालेली ही तिसरी मोठी चकमक आहे.

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा मनिला येथे आशियाई आणि पाश्चिमात्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत चीनच्या सागरी हालचालींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. फिलिपिन्सच्या तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, ही घटना स्कारबोरो शोलजवळ घडली. चीनच्या एका तटरक्षक जहाजाने सरकारी मत्स्य विभागाच्या बीआरपी दातुक्स पडुहिनोग या नौकेपासून केवळ सात मीटर अंतर राखले होते.

फिलिपिन्सने म्हटले की, चीनने अत्यंत बेफिकिरीने ही कारवाई केली असून त्यामुळे दोन्ही जहाजांमध्ये धडक होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता.फिलिपिन्सच्या तटरक्षक दलाने चीनच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला. त्यांनी सांगितले की, स्कारबोरो शोल हा फिलिपिन्सचा अविभाज्य भाग असून त्याच्या आसपासचा सागरी परिसर देशाच्या प्रादेशिक सीमांचा आणि विशेष आर्थिक क्षेत्राचा (EEZ) भाग आहे.

तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारीदेखील स्कारबोरो शोलजवळ मत्स्य विभागाच्या दोन नौकांना चीनच्या तटरक्षक जहाजांनी अडथळे निर्माण केले होते. यावेळी एका नौकेवर उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.दुसरीकडे, चीनच्या तटरक्षक दलाने पुन्हा एकदा स्कारबोरो शोलवरील आपला सार्वभौम हक्क असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या भागात बेकायदेशीररीत्या कार्यरत असलेल्या फिलिपिन्सच्या अनेक जहाजांविरुद्ध त्यांनी नियंत्रणात्मक कारवाई केली. चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला दावा सांगतो. मात्र, २०१६ मधील आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयात हा दावा फेटाळण्यात आला होता.

दशकांपासून सुरू असलेल्या या सागरी वादावर दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (आसियान) तसेच आशियाई आणि पाश्चिमात्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या तीन दिवसीय बैठकीतही चर्चा झाली. ही बैठक मंगळवारपासून मनिला येथे बंद दरवाजांआड सुरू आहे. यामध्ये पश्चिम आशिया आणि युक्रेनमधील संघर्षांवरही चर्चा करण्यात आली.

आसियानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी दक्षिण चीन समुद्रातील वादावर सविस्तर चर्चा केली. संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले की, काही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी समुद्रात कृत्रिम भूभाग निर्माण करणे, वादग्रस्त कारवाया, गंभीर घटना, लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृती आणि सागरी पर्यावरणाचे होणारे नुकसान याबाबत चिंता व्यक्त केली.

११ सदस्यीय या प्रादेशिक संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनसोबत प्रस्तावित आचारसंहितेबाबत (Code of Conduct) झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे स्वागत केले. या प्रस्तावित कराराचा उद्देश वादग्रस्त सागरी क्षेत्रात मोठा लष्करी संघर्ष टाळणे हा आहे. त्यांनी यावर्षी ही चर्चा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बुधवारी मनिला येथे भेट घेतली. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या बैठकीदरम्यान, ही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी सोमवारी सेकंड थॉमस शोलजवळ फिलिपिन्स आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीवरही चर्चा केली. त्या घटनेत चीनच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी लाकडी दांडक्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये फिलिपिन्सच्या नौदलातील दोन जवान जखमी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande