
चित्रपट : 'दुल्हनिया ले आएगी' कलाकार : खुशाली कुमार, महेश मांजरेकर, पियुष मिश्रा, स्नेहील दीक्षित, ओंकार कपूर, आगु स्टॅनली दिग्दर्शक : आकाशआदित्य लामा लेखक : जयंत गुप्ता, अनुप्रिया रॉय शैली : रोमँटिक कॉमेडी / फॅमिली ड्रामा रेटिंग : ⭐⭐⭐½ (३.५/५)
बॉलिवूडमध्ये लग्न आणि वरातींवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, पण 'दुल्हनिया ले आएगी' आपल्या वेगळ्या संकल्पनेमुळे उठून दिसतो. यात नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी येत नाही, तर नवरी स्वतःच नवरदेव शोधायला निघते. या रंजक कल्पनेवर आधारित हा चित्रपट विनोद, भावना आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा एक सुंदर मिलाफ सादर करतो. दिग्दर्शक आकाशआदित्य लामा यांनी एक हलकी-फुलकी पण मनाला भिडणारी कथा मनोरंजक पद्धतीने पडद्यावर मांडली आहे.
कथानक : हा चित्रपट एका मोठ्या कंपनीत एचआर (HR) प्रमुख असलेल्या नव्या (खुशाली कुमार) हिच्याभोवती फिरतो. तिचे वडील देवी प्रसाद (महेश मांजरेकर) मुलीच्या लग्नासाठी खूप उत्साहित आहेत आणि कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे; मात्र, लग्नाच्या अगदी काही काळ आधी नव्याला तिच्या होणाऱ्या पतीचे खरे रूप समजते. तिला कळते की तिचा होणारा पती लबाड आहे आणि त्याला स्त्रियांचा आदर नाही. परिणामी, ती लग्न मोडण्याचा निर्णय घेते.
तरीही, तिला तिच्या आजारी वडिलांच्या प्रकृतीची चिंता सतावते. त्यांना धक्का बसू नये म्हणून, नव्या एक अनपेक्षित निर्णय घेते. ती लग्नाच्या ठिकाणीच नवीन नवरदेव शोधायला सुरुवात करते. या प्रवासात तिला अनेक विचित्र, मजेशीर आणि भावनिक प्रसंगांचा सामना करावा लागतो. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसे नातेसंबंध, विश्वास आणि योग्य जोडीदार निवडण्याचे महत्त्व या गोष्टी मनोरंजक पद्धतीने मांडल्या जातात.
दिग्दर्शन : दिग्दर्शक आकाशआदित्य लामा यांनी हा चित्रपट हलक्या-फुलक्या शैलीत सादर केला आहे. चित्रपटात विनोद आणि भावना यांचा उत्तम समतोल साधला गेला आहे. हा चित्रपट कुठेही अतिशय गंभीर होत नाही किंवा आपल्या मूळ कथानकापासून भरकटत नाही. लेखक जयंत गुप्ता आणि अनुप्रिया रॉय यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील भावना, लग्नाची तयारी आणि नातेसंबंधांमधील जिव्हाळा अतिशय वास्तववादी पद्धतीने टिपला आहे. चित्रपटातील काही दृश्ये खळखळून हसवतात, तर काही दृश्ये मनाला भिडणारी आणि भावूक करणारी आहेत.
अभिनय : खुशहाली कुमारने 'व्या'च्या भूमिकेत आत्मविश्वास आणि परिपक्वता दर्शवली आहे. तिची अभिनयाची छाप भावनिक आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या दृश्यांमध्ये दिसून येते. महेश मांजरेकर एका प्रेमळ आणि जबाबदार वडिलांच्या भूमिकेत अत्यंत नैसर्गिक वाटतात; त्यांच्या आणि खुशहाली यांच्यातील भावनिक दृश्ये ही या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू आहे. पियुष मिश्रा आपल्या विशिष्ट शैलीने आणि संवादफेकीने मनोरंजनात भर घालतात. त्याचबरोबर, स्नेहील दीक्षित ही या चित्रपटातील सर्वात मोठे सरप्राईज ठरली आहे. तिची उत्कृष्ट 'कॉमिक टायमिंग' अनेक दृश्यांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवते. ओंकार कपूर आणि आगु स्टॅनली यांनीही आपापल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे.
तांत्रिक बाजू : छायांकन (सिनेमॅटोग्राफी) अतिशय जिवंत आणि आकर्षक आहे. लग्नाचे वातावरण, संगीत आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यात अतिशय सुंदररीत्या टिपली गेली आहे. पार्श्वसंगीत कथेला पूरक ठरते आणि चित्रपटाचा वेग सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहतो. संकलन (एडिटिंग) चोख असल्याने चित्रपट कुठेही कंटाळवाणा किंवा रेंगाळणारा वाटत नाही.
अंतिम निष्कर्ष : 'दुल्हनिया ले आएगी' हा एक परिपूर्ण कौटुंबिक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे, जो मनोरंजन करण्यासोबतच नातेसंबंधांचे महत्त्व आणि योग्य निर्णय घेण्याबाबतचा संदेशही देतो. चित्रपटाची अनोखी संकल्पना, हलका-फुलका विनोद, भावनिक कथा आणि प्रभावी अभिनय यामुळे हा एक आनंददायी अनुभव ठरतो. जर तुम्ही कुटुंबासोबत पाहण्यासाठी असा एखादा चित्रपट शोधत असाल ज्यात हास्य, भावना आणि मनाला स्पर्श करणारे क्षण असतील, तर 'दुल्हनिया ले आएगी' हा या आठवड्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
- लोकेश चंद्र दुबे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर