
वॉशिंग्टन , 24 जुलै (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. अमेरिकन सैन्याने गुरुवारी सलग १३व्या रात्री इराणवर हल्ले केले. त्याचवेळी,यमनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या दोन तेलवाहू टँकरांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या घटनांमुळे संपूर्ण पश्चिम आशियात संघर्ष आणखी विस्तारण्याची भीती वाढली आहे.या घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारावरही दिसून आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पुढे गेली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सांगितले की, ताज्या हल्ल्यांचा उद्देश इराणची ती क्षमता कमकुवत करणे हा आहे, ज्याच्या माध्यमातून तो प्रादेशिक समुद्री क्षेत्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजे आणि नाविकांसाठी धोका निर्माण करत आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की,होर्मुझ सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकन हल्ल्यांनंतर काही वेळातच इराणच्या सरकारी माध्यमांनी होर्मुझ सामुद्रधुनीजवळील बंदर अब्बास आणि केश्म बेट परिसरात स्फोट झाल्याची माहिती दिली. याशिवाय, उत्तर-पश्चिमेकडील अँडिमेश्क आणि ओमिदियेह परिसरातही स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, या स्फोटांमुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, हूती बंडखोरांनी आणखी एका महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गात अडथळा निर्माण करण्याची धमकी दिली आहे. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याने आधीच जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सामान्य परिस्थितीत जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा या समुद्री मार्गातून होतो. त्यामुळे अनेक देश पर्यायी जहाजवाहतूक मार्गांचा शोध घेत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, जहाजांवरील हल्ले सुरूच राहिल्यास हूती बंडखोरांना “कठोर लष्करी शिक्षा” दिली जाईल. त्यांनी सामाजिक माध्यमांवर लिहिले की, भविष्यात असे हल्ले पुन्हा झाल्यास अमेरिका त्यासाठी थेट इराणला जबाबदार धरेल, कारण हूती संघटना इराणच्या पाठबळावर कार्य करते.ट्रम्प यांनी इशारा दिला की, इराण आणि हूती या दोघांनाही याचे गंभीर लष्करी परिणाम भोगावे लागतील.
सतत वाढणाऱ्या तणावाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर दिसून आला. गुरुवारी ब्रेंट क्रूड तेलाच्या किंमतीत ६ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ती जवळपास प्रति बॅरल १०० डॉलर्सपर्यंत पोहोचली. मे महिन्यात झालेल्या तात्पुरत्या शांतता करारानंतरचा हा सर्वोच्च स्तर मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सागरी मार्ग दीर्घकाळ विस्कळीत राहिल्यास जागतिक महागाई आणि ऊर्जा संकट आणखी गंभीर होऊ शकते.
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले संबंध असलेले इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी गुरुवारी तेहरान येथे पोहोचले आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, इराकची भूमी इराणवरील कोणत्याही लष्करी हल्ल्यासाठी वापरू दिली जाणार नाही.
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेत इशारा देताना सांगितले की, संपूर्ण प्रदेश वेगाने व्यापक संघर्षाकडे वाटचाल करत आहे. त्यांनी नमूद केले की, सध्याच्या संकटावर एकमेव उपाय म्हणजे कूटनीती आणि संवाद. तसेच पाकिस्तानसह सर्व मध्यस्थ देशांच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode