
मुंबई, 24 जुलै, (हिं.स.)। यश राज फिल्म्सने दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या आगामी आणि अद्याप शीर्षक न ठरलेल्या रोमँटिक ॲक्शन ड्रामा चित्रपटाची घोषणा केली असून त्याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट २६ मार्च २०२७ (गुड फ्रायडे) रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात आहान पांडे, शर्वरी, ऐश्वर्या ठाकरे आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असतील.
या चित्रपटाचे चित्रीकरण प्रामुख्याने युनायटेड किंगडम (यूके) मध्ये करण्यात आले आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचे कथानक किंवा त्यातील पात्रांबाबत फारशी माहिती दिलेली नाही. रोमान्स, ॲक्शन आणि ड्रामा यांचा समावेश असलेला हा चित्रपट यश राज फिल्म्सची एक महत्त्वपूर्ण निर्मिती मानली जात आहे.
निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर यांच्यातील हा पाचवा सहयोग आहे. यापूर्वी त्यांनी 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'गुंडे', 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. त्यामुळे, या नवीन प्रकल्पाबाबत प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टी या दोघांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर