
नवी दिल्ली, २६ जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात भारताच्या अलीकडील क्रीडा कामगिरीची प्रशंसा करताना, बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचा जपान ओपनमधील ऐतिहासिक विजय आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचा लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी विजय हे देशासाठी अभिमानाचे क्षण असल्याचे म्हटले.
'मन की बात'च्या १३६ व्या भागात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या तरुणांनी अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पीव्ही सिंधू जपान ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
सिंधूने नुकतेच जपानच्या अकाने यामागुचीला २१-१७, २१-१७ ने पराभूत करून बीडब्ल्यूएफ जपान ओपन सुपर-७५० महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. यासोबतच, जपान ओपनचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. तिने आपल्या कारकिर्दीतील पहिले सुपर-७५० विजेतेपदही जिंकले.
पंतप्रधान मोदींनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतीय महिला क्रिकेट संघाने लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर कसोटी सामनाही जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. आमच्या संघाने हा सामना २७० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला, पण एवढेच नाही. लॉर्ड्सच्या प्रदीर्घ इतिहासातील हा पहिला महिला कसोटी सामना होता. १९८३ मध्ये, भारताने याच मैदानावर आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता, आपल्या महिला शक्तीने येथे देशाला गौरव मिळवून दिला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या एकमेव महिला कसोटी सामन्यात इंग्लंडला २७० धावांनी पराभूत करून भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे