मुसळधार पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत
- पुणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट आणि मुंबई, ठाणे व पालघरसाठी यलो अलर्ट मुंबई, 03 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत सलग कोसळणाऱ्या म
Mumbai surrounding areas due to heavy rains


- पुणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट आणि मुंबई, ठाणे व पालघरसाठी यलो अलर्ट

मुंबई, 03 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने शनिवार, ४ जुलै रोजी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या ताज्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, शहरातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. हा इशारा 'वेरी लाइकली' अर्थात अत्यंत शक्य या श्रेणीत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच सखल भाग, समुद्रकिनारा आणि झाडांच्या परिसरात विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सकाळपासून शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विले पार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस होता. काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. अंधेरी सबवेमध्ये मुसळधार पावसामुळे सुमारे दोन फूट पाणी साचले होते. पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ सबवेतील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला असून वाहनांची ये-जा पूर्ववत सुरू झाली आहे. मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरु असल्याने त्याचा फटका लोकल वाहतुकीला बसला ही बसल्याचे जाणवले. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10-15 मिनिटं उशिरानं धावत होत्या. पश्चिम मार्गावरील लोकल 15-20 मिनिटं उशिरानं सुरु होती. प्रशासनाने लोकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यात तसेच सातारा या भागात रेड अलर्ट असणार आहे.

घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

पालघर मधील आगरी पाडा परिसरात बुधवारी पावसामुळे घराची भिंत अंगावर कोसळल्याने राबिया शब्बीर सय्यद (४७) या महिलेचा मृत्यू झाला. घरात साचलेले पाणी राबिया व त्यांचे पती काढत असताना ही दुर्घटना घडली. नैसर्गिक आपत्ती निकषाप्रमाणे त्या महिलेच्या कुटुंबीयांना लाभ मिळावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

राज्याच्या इतर भागांमध्ये ७ जुलैपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एकूण २०४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मलबार हिल (१४६ मिमी), फोर्ट (१३९ मिमी), अंधेरी (१३६ मिमी), वर्सोवा (१२९ मिमी), पवई (१२४ मिमी), मानखुर्द (११८ मिमी), भांडुप (११६ मिमी) आणि मुलुंड (११५ मिमी) यांचा समावेश आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील ७२ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये केवळ २४ तासांत २०० मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस आणि विजांचा इशाराही जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे. घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती सध्या चांगली आहे. 6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल. राज्यात इतर भागात पावसाची तीव्रता कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. राज्यात सर्वदूर पाऊस आहे, मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा आहे. आगामी तीन ते चार दिवस मुंबईत पावसाची स्थिती आहे आणि तशीच राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे, असंही एस.डी. सानप म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande