
बीड, 03 जुलै (हिं.स.)। पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणात आता बीडमधील एका तरुणाची एन्ट्री झाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडावरून खाली ढकलले. या अत्यंत गंभीर गुन्ह्यानंतर आरोपींनी सर्वात आधी बीडमधील एका तरुणाशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपींनी सर्वप्रथम या तरुणाची भेट घेतली आणि त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून संबंधित तरुणाला या कटाची आधीपासूनच पूर्वकल्पना होती का, या दिशेने कसून चौकशी केली जात आहे.
तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांना हे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या हत्येच्या पूर्वनियोजित कटामध्ये बीडच्या या तरुणाची भूमिका काय होती आणि त्याने आरोपींना काही मदत केली होती का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तातडीने कारवाई करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis