“संघ सेंट्रली किंवा रिमोट कंट्रोलने काम करीत नसतो”- डॉ. मोहन भागवत
नागपूर, 03 जुलै (हिं.स.) : समाजात स्वयंसेवकांनी सुरू केलेले अनेक उपक्रम आणि संस्था कार्यरत आहेत. लोकांना असे वाटते की, हे सर्व संघ केंद्रीय पद्धतीने (सेंट्रली ऑपरेट) किंवा रिमोट कंट्रोलने चालवतो.परंतु, हे सत्य नाही. संघाच्या रचनेत आणि कार्यपद्धती
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, फाईल फोटो


नागपूर, 03 जुलै (हिं.स.) : समाजात स्वयंसेवकांनी सुरू केलेले अनेक उपक्रम आणि संस्था कार्यरत आहेत. लोकांना असे वाटते की, हे सर्व संघ केंद्रीय पद्धतीने (सेंट्रली ऑपरेट) किंवा रिमोट कंट्रोलने चालवतो.परंतु, हे सत्य नाही. संघाच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत असे होत नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित 'डॉ. हेडगेवार : आधुनिक युगातील शालिवाहन' या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. भागवत म्हणाले की, संघाचे कार्य केवळ संघटना उभारणे नाही, तर समाजाला आवश्यक असलेले चारित्र्यसंपन्न आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व घडविणे हे आहे. स्वयंसेवकाचा पहिला गुण हा केवळ संघकार्य करणे नसून, संघाच्या विचारांनुसार जीवन जगणे असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. काळानुसार कार्याची पद्धत आणि स्वरूप बदलू शकते; मात्र त्यामागील मूलतत्त्व कधीही बदलता कामा नये. तत्त्वे केवळ पुस्तकांत वाचण्यासाठी किंवा भाषणांत ऐकण्यासाठी नसतात, तर ती आचरणातून जगली गेली पाहिजेत. संघाचा सक्रिय कार्यकर्ता असणे हा दुसरा गुण आहे; मात्र संघाचे जीवन जगणे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गुण आहे.

स्वयंसेवक सहभागी असलेल्या सर्वच उपक्रमांचे संचालन संघाकडून केंद्रीयरित्या केले जाते, असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात तसे नाही. समाजाला ज्या प्रकारच्या व्यक्तींची गरज आहे, त्या घडविण्याचे कार्य संघ करतो. त्या संस्कारांचे प्रतिबिंब स्वयंसेवकांच्या कुटुंबात आणि संघाच्या शाखांमध्ये दिसून येते. संघाच्या शाखा या संघविचारांच्या प्रयोगशाळा आहेत, असे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवकाचे जीवन म्हणजे पूर्णत्वाकडे नेणारी अखंड साधना असून ती आयुष्यभर करावी लागते, असे सांगताना त्यांनी डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे उदाहरण दिले. भारताने पुन्हा जगाला मार्गदर्शन करायचे असेल, तर भारतीय समाज आणि कुटुंबांनी असे जीवन जगले पाहिजे की, त्यातूनच जगाला शिक्षण आणि प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. भागवत म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या व्यक्तिमत्त्वामागील सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे त्यांचे संपूर्ण समर्पण. त्यांनी तन, मन आणि धनासह स्वतःच्या स्वभावावरही विजय मिळवला. स्वतःचा स्वभाव बदलण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. समर्पणाच्या मार्गावर पुढे जाताना 'मी समर्पित आहे' या भावनेचाही अहंकार निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही अनेकजण प्रत्येक गोष्टीत पाश्चात्त्यांचे अनुकरण करत होते. मात्र, डॉ. हेडगेवार यांनी आपल्या जीवनातून भारतीय जीवनमूल्यांचा आदर्श घालून दिला. जगाला ज्या प्रकारचे जीवन द्यायचे आहे, ते आधी आपण स्वतः जगले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

देश-विदेशातील अनेक लोक आपल्या युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी संघाच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले. समाजपरिवर्तनाचे कार्य सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. कोणी वेगाने पुढे जातो, तर कोणी हळूहळू; मात्र सर्वांनी धर्म, संस्कृती आणि राष्ट्रजीवनाच्या रक्षणासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande