
नवी दिल्ली , 03 जुलै (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) माध्यमातून दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर नेले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
ख्रिस्तोफर लक्सन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात न्यूझीलंडच्या त्यांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, न्यूझीलंडच्या आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे.”
ते पुढे म्हणाले, “एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या न्यूझीलंड-भारत मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून आम्ही द्विपक्षीय संबंधांना नव्या टप्प्यावर नेत आहोत. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, निर्यात वाढेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच १.४ अब्ज लोकसंख्येच्या भारतीय बाजारपेठेत न्यूझीलंडच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक समुदायांना अधिक उत्पन्न, रोजगार आणि वेतनवाढीचा लाभ मिळेल.”
यापूर्वी, ६ मे रोजी न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांनी भारत आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार येत्या काही वर्षांत दुप्पट होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. दोन्ही देश उच्च दर्जाच्या मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देत असल्याने ही वाढ शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.मुलाखतीत टॉड मॅक्ले म्हणाले की, हा मुक्त व्यापार करार न्यूझीलंडमधील ग्राहकांच्या उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. भारतीय बाजारपेठेत अशा अनेक दर्जेदार वस्तू आणि सेवा सहज उपलब्ध आहेत. तसेच, न्यूझीलंड सरकारने पुढील १५ वर्षांत भारतातील गुंतवणूक २० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
याच वर्षी एप्रिलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती.
हा करार दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांसाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. या व्यापक करारामध्ये बाजारपेठेतील प्रवेश, कृषी उत्पादकता, गुंतवणूक, कुशल मनुष्यबळाची देवाणघेवाण (टॅलेंट मोबिलिटी), क्रीडा, पर्यटन तसेच लोकांमधील परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी सहकार्याचा समावेश आहे.या मुक्त व्यापार कराराचा लाभ दोन्ही देशांतील उत्पादक, शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), महिला उद्योजक, विद्यार्थी तसेच कुशल व्यावसायिकांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode