
मुंबई, 03 जुलै (हिं.स.)। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी आणि देणगी निधीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. राम मंदिराच्या निधीवर भाजपने दरोडा टाकल्याचा थेट आरोप त्यांनी केला असून या प्रकरणावरून त्यांनी भाजपविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या रविवारी, ५ जुलै रोजी मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिराजवळ भव्य ‘रामरक्षा’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे मात्र या पक्षाची मुळे ज्या आंदोलनातून उभी राहिली, त्या आंदोलनात देशातील सर्व हिंदू सहभागी होते. तो काळ आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्या घटनांचे चित्रण माध्यमांमधून जनतेच्या मनावर खोलवर ठसलेले आहे. कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्रा हत्याकांड, अहमदाबादमधील दंगल आणि मुंबईत घडलेल्या घटना या सगळ्यात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात सहन केले आहे. या सर्व घटनांवर आधारित भांडवल करून भारतीय जनता पक्ष पुढे आला. त्या काळात, देशात त्यांच्या फक्त दोन खासदार होते आणि ‘गांधीवादी समाजवाद’ हा त्यांचा कार्यक्रम होता, पण नंतर त्यांनी तो मार्ग सोडून हिंदुत्व स्वीकारले आणि राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला,” असे त्यांनी सांगितले.
“आज देशात भारतीय जनता पक्षाच्या काळात राम मंदिराचा विषय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे, हे दुर्दैवी आहे. राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदारांना गोवा किंवा इतर ठिकाणी नेले जात आहे, खरेदी-विक्री सुरू आहे आणि या प्रकाराला ‘ऑपरेशन’ असे नाव दिले जाते. मग आता हे ‘ऑपरेशन राम मंदिर’ भाजप करत आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असोत किंवा नसो, राम मंदिरावर काही प्रमाणात दरोडा टाकला जात असल्याचे चित्र आहे. याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. काहींच्या मते, चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे, हे अत्यंत गंभीर आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जसे एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की ‘अब हिंदू मार नहीं खाएगा’, तसेच मी म्हणतो की मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू कधीही माफ करणार नाही. जे मंदिरांवर आघात करत आहेत, त्यांना त्याची जाणीव करून दिली जाईल. याची सुरुवात येत्या रविवारपासून होत आहे. 5 तारखेला दादर येथील हनुमान मंदिरासमोर मी सर्व हिंदूंना आमंत्रित करतो. पक्षाचा विचार न करता, ज्यांना राम मंदिराशी संबंधित घडामोडी सहन होत नाहीत, असे सर्व हिंदूंनी एकत्र यावे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आणि लोकप्रतिनिधी असतील. केवळ शिवसैनिकच नव्हे, तर बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व जपणारे सर्वजण यात सहभागी होऊ शकतात. तिथे आम्ही ‘रामरक्षा’ आंदोलन करू, रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणू. हा कार्यक्रम तिथून सुरू केला जाईल,” असे त्यांनी जाहीर केले.
यानंतर राज्यभर जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये आणि खेड्यांमध्येही जिथे जिथे राम मंदिर किंवा हनुमान मंदिर आहे, तिथे सर्व रामभक्त आणि हिंदू एकत्र येतील. आता वारीची सुरुवात होत आहे, आणि वारकरी सुद्धा या मंदिरांच्या लुटीविरोधात ज्या लोकांच्या मनात राग आहे, ते सर्व एकत्र येतील. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारावी लागेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule