
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.) : केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानात सक्रिय असलेल्या 23 व्यक्तींना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. या व्यक्तींचा जैश-ए-मोहम्मद , लष्कर-ए-तैयबा तसेच इतर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप सरकारने केला आहे.
याबाबत गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, संबंधित व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी युवकांची भरती करणे, घुसखोरी घडवून आणणे, दहशतवादी प्रशिक्षण देणे, ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे तसेच दहशतवादी हल्ल्यांचे कट रचणे अशा गंभीर कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या 23 जणांपैकी तिघे हे लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदचे निकटवर्तीय सहकारी असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, तिघांवर 2016 मध्ये नगरोटा येथील लष्करी तळावरील हल्ल्यात सहभागाचा, तर दोघांवर 2018 मधील सुंजवान लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.
गृह मंत्रालयाने अब्दुल रऊफ, हाफिज खालिद वलीद आणि राणा इफ्तिखार यांची हाफिज सईदचे निकटचे सहकारी म्हणून ओळख पटवली आहे. अधिसूचनेनुसार, राणा इफ्तिखार विविध दहशतवादी संघटनांमध्ये समन्वय साधणे, युवकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करणे आणि हाफिज सईदचा विश्वासू सहकारी म्हणून काम करत होता.तसेच, अब्दुल रऊफ हा लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावा या संघटनांशी संबंधित असून, दहशतवादी कारवायांचे नियोजन, समन्वय आणि निधी उभारणीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हाफिज खालिद वलीद हा हाफिज सईदच्या सुरक्षा व्यवस्थेत कार्यरत राहून अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार असल्याचा दावा अधिसूचनेत करण्यात आला आहे.
या व्यक्तींचा दहशतवादी यादीत समावेश झाल्यामुळे राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) त्यांच्या आर्थिक स्रोतांवर निर्बंध घालणे, शस्त्रास्त्र व्यवहार रोखणे आणि मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार मिळणार आहेत. यूएपीए कायद्यात 2019 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वैयक्तिक व्यक्तींनाही दहशतवादी म्हणून घोषित करण्याची तरतूद करण्यात आली होती. यापूर्वी केवळ संघटनांनाच दहशतवादी घोषित करता येत होते.पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या या 23 जणांचा दहशतवादी यादीत समावेश करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारच्या दहशतवादी यादीतील एकूण व्यक्तींची संख्या 80 वर पोहोचली आहे.सरकारने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या संघटनांशी संबंधित अनेक संशयित दहशतवाद्यांचा या यादीत समावेश केला असून, त्यांच्यावर जम्मू-काश्मीरमधील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाचे आरोप आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी