ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसची नियमित त्रि-साप्ताहिक सेवा सुरू
नागपूर, 04 (हिं.स.) : पूर्व भारतातील ब्रह्मपूर आणि पश्चिम भारतातील उधना यांना जोडणारी १९०२१/१९०२२ अमृत भारत एक्स्प्रेस आता नियमित त्रि-साप्ताहिक धावणार आहे. या सेवेमुळे नागपूर, बडनेरा, भुसावळसह विदर्भातील प्रवाशांना जलद, थेट आणि आधुनिक रेल्वे प्रव
अमृत भारत एक्स्प्रेस लोगो


नागपूर, 04 (हिं.स.) : पूर्व भारतातील ब्रह्मपूर आणि पश्चिम भारतातील उधना यांना जोडणारी १९०२१/१९०२२ अमृत भारत एक्स्प्रेस आता नियमित त्रि-साप्ताहिक धावणार आहे. या सेवेमुळे नागपूर, बडनेरा, भुसावळसह विदर्भातील प्रवाशांना जलद, थेट आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

पूर्व आणि पश्चिम भारतातील रेल्वे संपर्क अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही गाडी उद्घाटन विशेष फेरीनंतर आता नियमित सेवेत दाखल झाली आहे. गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर आणि १९०२२ ब्रह्मपूर–उधना या क्रमांकाने ती धावणार आहे. ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांना जोडणारी ही सेवा विशेषतः विदर्भातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गाडी क्रमांक १९०२१ अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून सकाळी ७.१० वाजता सुटून भुसावळ येथे दुपारी १२.३५, बडनेरा येथे सायंकाळी ४.२० आणि नागपूर येथे सायंकाळी ७.२० वाजता पोहोचते. त्यानंतर वर्धा, गोंदिया, दुर्ग, रायपूर, रायगडा, विजयानगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलासा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १.५५ वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचते. त्यामुळे विदर्भातून पूर्व भारतात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

अमृत भारत एक्स्प्रेस ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी आधुनिक आणि आरामदायी प्रवासाची संकल्पना लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. गाडीत एकूण २२ डबे असून सुधारित आसनव्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, मोबाईल चार्जिंग सुविधा, प्रवासी माहिती प्रणाली, सुरक्षित अंतर्गत रचना आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

नागपूर, बडनेरा आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवरील थांब्यांमुळे व्यापारी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे तसेच पर्यटन व धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. यापूर्वी अनेक प्रवाशांना बदल करून प्रवास करावा लागत होता. मात्र, या थेट रेल्वे सेवेमुळे वेळेची बचत होण्यासोबतच पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम भारतातील औद्योगिक, व्यावसायिक तसेच सामाजिक देवाणघेवाणीलाही चालना मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande