एकनाथ शिंदे उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
ठाणे, 04 जुलै (हिं.स.) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, धावपळ आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे
Eknath Shinde Admitted Private Hospital Thane Treatment


ठाणे, 04 जुलै (हिं.स.) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, धावपळ आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे त्यांची तब्येत बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांना ताप आल्याची तसेच प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती मिळाली. प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून उपचार सुरू केले आहेत. उपचारादरम्यान त्यांना काही काळ पूर्ण विश्रांतीचा सल्लाही देण्यात आल्याचे समजते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या नियोजित सर्व कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला. ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. धुळे येथील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता, मात्र शिंदे यांच्या प्रकृतीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांनी अनेक बैठका घेतल्या तसेच विविध राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावली. 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून ठाकरे गटातील काही नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात सहभागी करून घेण्याच्या हालचालींमुळे ते सतत चर्चेत होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक वेळा दिल्ली दौरेही केले.

राज्यातील राजकीय घडामोडी, पक्षसंघटनेची जबाबदारी आणि शासकीय कामकाज यामुळे त्यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला होता. त्याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून वैद्यकीय सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा नियमित कामकाजाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande