
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.)। सरकारने कांद्याच्या खरेदी किमतीत 13 टक्के वाढ करून ती 2,125 रुपये प्रति क्विंटल केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि बफर खरेदी मजबूत होईल. नवीन दर 4 जुलैपासून लागू झाले आहेत.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने 'प्राइस स्टॅबिलायझेशन बफर' (किंमती स्थिर ठेवण्यासाठी तयार केलेला साठा) साठी कांद्याच्या खरेदी किमतीत 13 टक्के वाढ केली आहे, जी 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून 2,125 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. हे नवीन खरेदी दर 4 जुलैपासून लागू झाले आहेत.
मंत्रालयाने सांगितले की सरकारच्या 'प्राइस स्टॅबिलायझेशन बफर' साठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ लिमिटेड (एनसीसीएफ) यांच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली जात आहे. कांदा खरेदीची ही नवीन किंमत कांदा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देईल आणि बफर साठा तयार करण्याच्या प्रयत्नांना मदत करेल.
दरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, कांद्याचे उत्पादन 307.37 लाख मेट्रिक टन (एलएमटी) राहण्याचा अंदाज आहे, जो 2024-25 मधील 307.67 एलएमटी उत्पादनाच्या जवळपास समान आहे. मंत्रालयाने सांगितले की कांदा उत्पादनाच्या या अंदाजानुसार सध्या कांद्याची एकूण उपलब्धता ही चिंता करण्यासारखी नाही. तथापि, किमतींमध्ये हंगामी चढ-उतारांमुळे थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये साठ्याची पातळी पुरेशी आहे. सध्या कांद्याच्या साठ्यात कोणत्याही प्रकारच्या कमतरतेचे संकेत नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule