नौदलाने मुंबई किनाऱ्याजवळ खराब हवामानात जखमी खलाशाची केली धाडसी सुटका
मुंबई, 04 जुलै (हिं.स.) - मुंबई किनाऱ्याजवळील ''एमटी देश शक्ती'' या कच्च्या तेलवाहू जहाजावरील एका ३० वर्षीय जखमी खलाशाची भारतीय नौदलाने खराब हवामानातही धाडसी सुटका केली. मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि खवळलेल्या समुद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही
rescue


rescue


मुंबई, 04 जुलै (हिं.स.) - मुंबई किनाऱ्याजवळील 'एमटी देश शक्ती' या कच्च्या तेलवाहू जहाजावरील एका ३० वर्षीय जखमी खलाशाची भारतीय नौदलाने खराब हवामानातही धाडसी सुटका केली. मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि खवळलेल्या समुद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही आयएनएस शिक्रा येथील सी किंग हेलिकॉप्टरने रेस्क्यू बास्केटच्या साहाय्याने खलाशाला सुरक्षित बाहेर काढले. हेलिकॉप्टरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी किनाऱ्यावर आणण्यात आले. शनिवारी मुंबईतील 'आयएनएस शिक्रा' या नौदलाच्या हेलिकॉप्टर तळावरून उड्डाण घेत ही आपत्कालीन वैद्यकीय बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

भारतीय तटरक्षक दलाने 'एक्स' या समाजमाध्यमावर या मोहिमेची माहिती दिली आहे. 'एमटी देश शक्ती' या भारतीय मालवाहू जहाजावरील एका ३० वर्षीय खलाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारांची गरज असल्याने, मेरीटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर आणि भारतीय नौदलाने अत्यंत वेगाने आणि अचूक समन्वय साधत ही बचाव मोहीम हाती घेतली.

भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडनेही या धाडसी मोहिमेचे तपशील शेअर केले आहेत. सध्या मुंबई व किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अशा कठीण परिस्थितीत बचावकार्य करणे हे नौदलासमोर एक मोठे आव्हान होते. सतत कोसळणारा पाऊस, अत्यंत कमी दृश्यमानता आणि खवळलेला समुद्र अशा जीवघेण्या परिस्थितीत हेलिकॉप्टर उडवणे अत्यंत धोकादायक होते. या सर्व नैसर्गिक संकटांवर मात करत, नौदलाच्या वैमानिकांनी अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टर जहाजावर घिरट्या घालत स्थिर ठेवले आणि 'रेस्क्यू बास्केट'चा वापर करून जखमी खलाशाला सुरक्षितपणे वर खेचून घेतले. खलाशाला हेलिकॉप्टरमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्याला किनाऱ्यावर आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande