पद, प्रसिद्धी मिळणार नाही हे माहित असूनही हजारो निःस्वार्थी माणसे संघकार्यात झोकून देतात - भैय्याजी जोशी
मुंबई, 04 जुलै (हिं.स.) - मला संघ समजला तो भाऊरावांसारख्या जीवनामुळे समजला. संघ जगणारे लोक आहेत म्हणून लोकांना संघ समजतोय. संघाच्या या खडतर मार्गाने जाताना भाऊरावांना मी कधीही रागावलेले पाहिलेले नाही, असे त्यांचे आदर्श जीवन होते. संघात पद, प्रसिद्ध
भैय्याजी जोशी


नामकरण


मुंबई, 04 जुलै (हिं.स.) - मला संघ समजला तो भाऊरावांसारख्या जीवनामुळे समजला. संघ जगणारे लोक आहेत म्हणून लोकांना संघ समजतोय. संघाच्या या खडतर मार्गाने जाताना भाऊरावांना मी कधीही रागावलेले पाहिलेले नाही, असे त्यांचे आदर्श जीवन होते. संघात पद, प्रसिद्धी काही मिळणार नाही हे माहित असूनही हजारो निःस्वार्थी, समर्पित आणि ध्येयवेडी माणसे संघकार्यात झोकून देतात. त्यांचे नेतृत्व करणारे भाऊराव होते. ही संघ गंगोत्री आता कुणीही थांबवू शकत नाही. भाऊरावांचे जीवन म्हणजे समर्पित संघकार्याच्या माध्यमातून भारतमातेची अखंड केलेली साधना आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी स्व. भाउरावांच्या कार्याचा गौरव केला.

कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली क्रॉस रोड क्रमांक ३ या मार्गाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. पुरुषोत्तम रामचंद्र तथा भाऊराव बेलवलकर यांचे नाव देण्यात आले. पायोनियर शाळेत संपन्न झालेल्या या नामकरण सोहळ्याला आमदार अतुल भातखळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आ. अतुल भातखळकर म्हणाले की , आमदार म्हणून अनेक विकासकामे केली, मात्र योग्य व्यक्तीचे नाव योग्य मार्गाला देण्याचे समाधान या निर्णयामुळे मिळाले. काही वर्षांपूर्वी हा प्रस्ताव मांडला तेव्हा अनेकांनी 'भाऊराव बेलवलकर कोण?' असा प्रश्न विचारला होता. आयुष्यभर संघकार्य करूनही प्रसिद्धीपासून दूर राहणे, हीच त्यांच्या स्वयंसेवक जीवनाची खरी पोचपावती होती असेही त्यांनी नमूद केले.

भाऊरावांचे ज्येष्ठ सुपुत्र रामचंद्र बेलवलकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक असून आज खऱ्या अर्थाने संघ तपस्वी असलेल्या भाऊरावांचा जीवन गौरव यानिमित्ताने होत आहे. मुंबई महानगराचे प्रचारक शिवरामपंत जोगळेकर यांच्याशी त्यांचा दृढ परिचय झाला आणि ते संघमय झाले. संघकार्याबरोबरच त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही अत्यंत समर्थपणे पार पाडल्या होत्या. कबड्डी , हुतूतू, बिलियर्ड्स आणि कॅरम या खेळांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande