मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; पश्चिम उपनगरांत जनजीवन विस्कळीत
मुंबई, 04 जुलै, (हिं.स.)। मुंबईत शनिवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाने पश्चिम उपनगरांसह संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत केले आहे. अवघ्या एका तासात झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिव
Torrential Rain Batters Mumbai Normal Life Disrupted Western Suburbs


मुंबई, 04 जुलै, (हिं.स.)। मुंबईत शनिवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाने पश्चिम उपनगरांसह संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत केले आहे. अवघ्या एका तासात झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक व्यवस्था देखील मंदावली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.

हवामान विभागाने आधीच मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि समुद्रकिनारी तसेच सखल भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाचा फटका सार्वजनिक वाहतुकीलाही बसला असून महा मुंबई मेट्रो मार्ग 2A वरील काही सेवा तांत्रिक कारणांमुळे विस्कळीत झाल्या आहेत. कांदरपाडा ते आनंदनगर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने काही भागांत मेट्रो सेवा अडचणीत आली असली तरी काही मार्गांवर मर्यादित स्वरूपात सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने पावसाच्या तीव्रतेचा विचार करून शहरातील शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सकाळच्या सत्रात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे वसई-विरार परिसरातही परिस्थिती गंभीर असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विरार पश्चिमेतील काही रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने नागरिकांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे.

सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचा मोठा परिणाम दिसून आला असून तुर्भे परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरी, मालाड आणि दहिसर सबवे पूर्णपणे बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गांवर ताण वाढला आहे. पवई परिसरात मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून काही वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात किरकोळ वाढ नोंदवली गेली असून सध्या पाणी साठा 9 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रशासनाने धरण क्षेत्रात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. एकूणच, मुंबईत सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे शहराचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande