
नवी दिल्ली , 05 जुलै (हिं.स.)। दिल्लीत रविवारी झालेल्या हलक्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून तापमानात घट झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील १५ विमानांचे मार्ग बदलावे लागले.
विमानतळाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे १० देशांतर्गत आणि ५ आंतरराष्ट्रीय विमाने जयपूर व लखनौकडे वळविण्यात आली. पावसानंतर राजधानीतील दमट उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत नवी दिल्लीतील वातावरण आल्हाददायक होते. या काळात तापमान २८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. दरम्यान, पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे विभागाने सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत दिल्लीतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या काळात किमान तापमान २६ ते २९ अंश सेल्सियस, तर कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियस दरम्यान नोंदविण्यात आले.
अहवालानुसार, काही भागांत किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहिले, तर अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले. तसेच, दिल्लीत १० ते १५ किमी प्रतितास वेगाने आग्नेय दिशेचे वारे वाहत होते. पालम परिसरात वाऱ्याचा वेग ताशी ३७ किमी पर्यंत पोहोचला.आयएमडी ने सांगितले की, पुढील २४ तासांत कमाल तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतरच्या दोन दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याचा अंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode