
नवी दिल्ली , 05 जुलै (हिं.स.)।भारतीय नौदलाच्या आयएनएस सुदर्शिनी या जहाजाने अमेरिकेत भारताची शान उंचावली आहे. अमेरिका आपल्या २५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असून, त्यानिमित्त न्यूयॉर्कमध्ये ‘युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल नेव्हल रिव्ह्यू 250’ आणि ‘सेल250’ या भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हडसन नदीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘परेड ऑफ सेल’ मध्ये भारतीय नौदलाच्या तीन मस्तूल असलेल्या आयएनएस सुदर्शिनीनेही दिमाखात सहभाग नोंदवला. जहाजावर अभिमानाने फडकणारा तिरंगा भारताच्या समृद्ध सागरी परंपरेचे जिवंत प्रतीक ठरला.
अमेरिकेतील भारतीय दूतावासाने हा अभिमानाचा क्षण सोशल मीडियावर शेअर केला. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी आयएनएस सुदर्शिनी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी बंदरात दाखल झाले. जगभरातील नौदलाच्या जहाजांच्या उपस्थितीत झालेल्या ‘परेड ऑफ सेल’मध्ये भारतीय जहाजाने विशेष लक्ष वेधून घेतले. या सहभागातून भारत-अमेरिका नौदल सहकार्य अधिक दृढ होत असल्याचा संदेशही देण्यात आला.
आयएनएस सुदर्शिनी सध्या ‘लोकायन २०२६’ या विशेष मोहिमेवर असून, ही महासागर ओलांडणारी दीर्घ ट्रान्स-ओशनिक मोहीम आहे. या मोहिमेला कोची येथून सुरुवात झाली असून,गेल्या पाच महिन्यांत जहाजाने १३ हजारांहून अधिक नॉटिकल मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश जगभरातील नौदलांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढवणे हा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे या भारतीय तत्त्वज्ञानाचा संदेश ही मोहीम जगभर पोहोचवत आहे.
न्यूयॉर्कमध्ये दाखल होण्यापूर्वी आयएनएस सुदर्शिनी मेरीलँडमधील बाल्टिमोर बंदरात पोहोचले होते. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बाल्टिमोरकडे जाताना जहाजाने ऐतिहासिक चेसापीक अँड डेलावेअर कालवा पार केला आणि मिड-अटलांटिक परिसरातील अनेक महत्त्वाच्या पुलांखालून प्रवास केला.
त्यापूर्वी १९ ते २३ जूनदरम्यान व्हर्जिनियातील नॉरफोक येथे आयोजित ‘सेल250 व्हर्जिनिया’ सोहळ्यातही आयएनएस सुदर्शिनीने सहभाग घेतला होता. त्या वेळीही ‘परेड ऑफ सेल’ आणि सिटी क्रू परेडमध्ये या जहाजाने जगभरातील नौदलाच्या जहाजांसह आपला दिमाख दाखवला होता.
आयएनएस सुदर्शिनी हे भारतीय नौदलाचे सेल ट्रेनिंग शिप (नौकानयन प्रशिक्षण जहाज) असून, नौसैनिकांना पारंपरिक नौकानयनाचे प्रशिक्षण देणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, त्याचबरोबर हे जहाज भारताच्या सागरी कूटनीतीचे प्रभावी माध्यम म्हणूनही ओळखले जाते.अमेरिकेतील या देशव्यापी सोहळ्यानंतर आयएनएस सुदर्शिनी बोस्टन आणि न्यू ऑर्लिन्स या बंदरांनाही भेट देणार आहे. ही मोहीम भारताच्या सागरी परंपरेचा आणि जागतिक मैत्रीचा संदेश जगभर पोहोचवत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode