

नवी दिल्ली, 05 जुलै (हिं.स.) -
भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील रिअर अॅडमिरल आलोक आनंद यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी सिंगापूरमधील चांगी नौदल तळावरील आपली बंदर भेट यशस्वीरित्या पूर्ण केली. ही भेट भारतीय नौदलाच्या परिचालनात्मक तैनातीचा भाग होती.
आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष आणि भारत सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाशी सुसंगत असलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात दोन्ही देशांच्या नौदलांमधील समन्वय आणि कार्यसुसंगतता वाढविण्यासाठी विविध व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये परस्पर युद्धनौकांना भेटी देण्याचाही समावेश होता.
या बंदर भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनीही आयएनएस कवरत्तीला भेट दिली. त्यांना नौदलाच्या कार्यपद्धती, युद्धनौकेवरील जीवन आणि भारतीय नौदलाच्या सागरी मूल्यांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.
ही भेट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने भारत आणि सिंगापूर यांच्यातील वाढत्या सागरी भागीदारीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या भेटीदरम्यान झालेल्या विविध उपक्रमांमुळे व्यावसायिक समज वाढण्यास, कार्यात्मक सहकार्य अधिक बळकट होण्यास तसेच प्रदेशातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी दोन्ही देशांच्या सामायिक प्रयत्नांना चालना मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी