
कोलकाता, 05 जुलै (हिं.स.)। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळून आली आहे. या घडामोडींमध्ये पक्षातील आमदार आणि खासदारांनी वेगवेगळे गट तयार करत नेतृत्वाविरुद्ध उघड भूमिका घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि अस्तित्व कुठेही जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांवर थेट आरोप करत म्हटले की काही नेते आता उघडपणे भारतीय जनता पक्षासाठी काम करत आहेत आणि पक्षविरोधी हालचाली करत आहेत. त्यांनी आव्हानात्मक सूर लावत म्हटले की, “जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर मला संपवावे लागेल.” तसेच, “तुमच्यात हिंमत असेल तर उघडपणे भाजपमध्ये सामील व्हा,” असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नेत्यांनीच आता पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने त्यांनी याला गद्दारी असे संबोधले असून अशा वर्तनाला मर्यादा असते, असेही त्यांनी ठणकावले आहे.
या राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी तृणमूल काँग्रेस मधील मोठी फूट आहे. 3 जून रोजी निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी वेगळा गट तयार करत नेतृत्वाविरुद्ध भूमिका घेतल्याचे समोर आले. या गटाने पक्षाचे चिन्ह आणि नावावर दावा करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने वाद अधिक तीव्र झाला. त्याचबरोबर 15 जून रोजी पक्षातील 20 खासदारांनीही वेगळा मार्ग स्वीकारत त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
या घडामोडींमध्ये चंद्रिमा भट्टाचार्य यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील अंतर्गत तणाव अधिक वाढला आहे. त्यानंतर त्या बंडखोर गटाचे नेते म्हणून ऋतब्रता बॅनर्जी यांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी या घडामोडींना मान्यता दिल्याने राजकीय समीकरणे आणखी बदलली आहेत.
सध्याच्या स्थितीनुसार पक्षाचे लोकसभेतील आणि राज्यसभेतील संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घटले आहे. पक्षात आता केवळ काहीच खासदार आणि आमदार उरल्याने नेतृत्वावर दबाव वाढला आहे. या संपूर्ण परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या चिन्हावर आणि जनाधारावर आपली पकड मजबूत असल्याचा दावा करत, जनतेच्या विश्वासावर कोणताही परिणाम होणार नाही, असा संदेश दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule