ज्येष्ठ लोकगायिका पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन
रायपूर, 05 जुलै (हिं.स.)। पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आणि छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला ‘पंडवानी’ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका डॉ. तीजन बाई यांचे निधन झाले. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी रायपूर येथील एम्स रुग्णालयात अखेरचा
Renowned folk singer  Dr. Teejan Bai passes away


रायपूर, 05 जुलै (हिं.स.)। पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आणि छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला ‘पंडवानी’ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका डॉ. तीजन बाई यांचे निधन झाले. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी रायपूर येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनामुळे भारतीय लोककला क्षेत्रावर शोककळा पसरली असून देशभरातून कलाकार, साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

डॉ. तीजन बाई यांनी आपल्या दमदार आवाज, प्रभावी अभिनय आणि अनोख्या सादरीकरणातून ‘पंडवानी’ या लोककलेला देशासह परदेशातही विशेष ओळख मिळवून दिली. महाभारतातील कथा त्यांनी रंगमंचावर जिवंत करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे ‘कापालिक’ शैलीत पंडवानी सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला कलाकार ठरल्या. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या शैलीत त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनल्या.

त्यांचा जन्म छत्तीसगडमधील भिलाईजवळील गनियारी गावात झाला. त्यांचे वडील हुनुकलाल परधा आणि आई सुखवती होते. अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेल्या तीजन बाई यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष आले. अवघ्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी लोककलेची साथ सोडली नाही. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी शेजारच्या गावात पहिले सार्वजनिक सादरीकरण केले. त्या कार्यक्रमासाठी त्यांना मानधन म्हणून केवळ 10 रुपये मिळाले होते. याच छोट्या सुरुवातीतून त्यांनी पुढे जागतिक कीर्तीचा प्रवास केला.

लोककलेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 1988 मध्ये पद्मश्री, 1995 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2003 मध्ये पद्मभूषण तसेच बिलासपूर विद्यापीठाकडून मानद डी.लिट. प्रदान करण्यात आली. 2016 मध्ये त्यांना एम. एस. सुब्बालक्ष्मी शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर 2019 मध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. तीजन बाई यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय लोकपरंपरा, संस्कृती आणि महाभारताच्या कथांना जागतिक व्यासपीठावर पोहोचवले. त्यांचे संपूर्ण आयुष्य लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी समर्पित राहिले. त्यांच्या निधनाने भारतीय लोकसंगीत आणि लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याची परंपरा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande