मोबाईलऐवजी मुलांना आजी-आजोबांचा सहवास द्या : डॉ. मोहन भागवत
नागपूर, ५ जुलै (हिं.स.) : मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी त्यांना लहानपणापासून मोबाईलच्या आहारी न नेता आजी-आजोबांच्या सहवासात वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे आयोजि
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, फाईल फोटो


नागपूर, ५ जुलै (हिं.स.) : मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी त्यांना लहानपणापासून मोबाईलच्या आहारी न नेता आजी-आजोबांच्या सहवासात वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे आयोजित ‘सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वी संयुक्त कुटुंबपद्धतीत आजी-आजोबा नातवंडांना गोष्टी सांगून संस्कार आणि कौटुंबिक मूल्यांची शिकवण देत असत. मात्र, बदलत्या सामाजिक व्यवस्थेमुळे अनेक वृद्धांना वृद्धाश्रमात राहावे लागत असून, मुलांच्या हातात लहान वयातच मोबाईल दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

आजच्या पिढीतील वाढती अस्वस्थता आणि ढासळते मानसिक आरोग्य ही गंभीर बाब असल्याचे सांगताना त्यांनी मनुष्याच्या जीवनात मनाचे महत्त्व अधोरेखित केले. गर्भावस्थेपासूनच मन आणि विचारांची जडणघडण सुरू होत असून, बालपणीचे अनुभव व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले.

बारावीत अपयश आल्याने आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेणे किंवा किरकोळ कारणांवरून घर सोडून जाण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांनी मुलांमध्ये संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद विकसित करण्यासाठी पालकांनी सातत्याने संवाद साधण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी आधुनिक मानसशास्त्राच्या मर्यादांकडेही लक्ष वेधले. पाश्चात्त्य मानसशास्त्रासोबतच पतंजली योगसूत्र, योगवासिष्ठ यांसारख्या भारतीय ज्ञानपरंपरेतील विचारांचा अभ्यास करून भारतीय संदर्भातील परिपूर्ण मानसशास्त्र विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. भारतीय आणि पाश्चात्त्य विचारांचा समन्वय साधून मानवकल्याणासाठी संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande