डोंबिवली : शास्त्रीनगर हॉस्पिटल मारहाण प्रकरणी; नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
संध्याकाळपर्यंत अटक करा नाहीतर महाराष्ट्र बंद करू - रोहित पवार डोंबिवली, 08 जुलै (हिं.स.) | कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मधील डॉक्टर व नर्स यांना मारहाण प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी शिंदे शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे
Ph01


संध्याकाळपर्यंत अटक करा नाहीतर महाराष्ट्र बंद करू - रोहित पवार

डोंबिवली, 08 जुलै (हिं.स.) | कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मधील डॉक्टर व नर्स यांना मारहाण प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी शिंदे शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बुधवारी संध्याकाळी अटक केली असल्याची माहिती कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. तसेच म्हात्रे यांचे खासगी अंगरक्षक रमेश लक्ष्मण पवार (५०, रा. वडारवाडी, डोंबिवली पूर्व), प्रकाश उर्फ प्रकाश उध्दव निकम (३५, रा. सुंदरा आई आर्केड, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम), अक्षय शरद कारंडे (३०, रा. कलम श्री सोसायटी, कोपर क्राॅस रोड, डोंबिवली पश्चिम) यांना पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणाचे आधारे मंगळवारी रात्री उशिरा अटक केली होती.

महापालिकेच्या कोपर येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून नगरसेवक रमेश म्हात्रेबाबत कारवाई सुरू असल्याचे समजून येत आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या साथीदारांनी रुग्णालयात जाऊन दोन डॉक्टर व दोन परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नवजात बाळाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात न्या असे सांगितल्यानंतर मारहाणी झाल्याचे समोर येत आहे.

या घटनेनंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, जखमी डॉक्टर व कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

दरम्यान मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.

याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची काय भूमिका असेल अशी चर्चा होत होती. त्याप्रमाणेच काही काळानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या विषयावर मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवसरात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे.

मात्र या घटनेविषयी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले की, जी काही घटना झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी ठासून सांगतो की मी महिला डॉक्टरांवर हात उचलला नाही. डॉक्टर मला मुलीसारखी आहे. त्या डॉक्टर सतत कानाला मोबाईल लावून बोलत होत्या त्यामुळे मी फोन ठेव बाजूला आमची तक्रार आधी घे असे बोललो मी मारलेलं नाही. आम्हाला मारायच यामध्ये काही घेणे देणे नाही. आम्ही हात उचलला नाही आणि याच्यापुढेही कधी उचलणार नाही. ज्यांच्यासाठी मी आलो होतो त्यांच्याकडून काय झालं ते जाणून घ्या असे बुधवारी सांगितले.

तर सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण महानगर पालिका शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सोमवारी दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर हल्ला झाल्याच्या अनुषंगाने फिर्यादी डॉक्टर वैभव साळुंके यांच्या तक्रारीनुसार कलम 132, 121(1), 351(2), 352, 189(2), 191(2) आणि इतर मेडिकल कायद्यानुसार विष्णुनगर पोलीस ठाण्यात चार पुरुष व एक महिला आरोपी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यामधील तिघांना अटक केली आहे.

संध्याकाळपर्यंत अटक करा नाहीतर महाराष्ट्र बंद करू

- रोहित पवार

महिला डॉक्टरांना स्थानिक नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी मारहाण केली. हे सत्ताधारी नगरसेवक आहेत. त्यांनी हॉस्पिटलमधील डॉ. वैभव यांनाही मारहाण केली, तेथील नर्सनांही लागलं. यावेळी महिला डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांना फोन करीत असतांना मारहाण केली हे योग्य नाही. या विषय विधानसभेत मांडून डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणार. डॉक्टर व स्टाफला आमचा पाठिंबा आहे. सत्ताधारी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नांव न घेता टोला लगावला की, नुसत ट्विट करून विषय संपत नसतो. डॉक्टरांची बाजू घ्या त्या नगरसेवकाला अटक आवश्यक होती. संध्याकाळपर्यंत वेळ देतो नाहीतर उद्या ह्याच भागात आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी डोंबिवलीत सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनीही शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरांशी संवाद साधला. डॉक्टरांनी आमचा सपोर्ट असून संबंधित आरोपींना अटक झाली पाहिजे. हॉस्पिटलमध्ये चौवीस तास पोलिस बंदोबस्त ठेवणे अधिक चांगले असेही सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande