देशभरात मुसळधार पावसाचा कहर; अनेक राज्यांत रेड व ऑरेंज अलर्ट
नवी दिल्ली, 08 जुलै (हिं.स.) : देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत देशातील निम्म्याहून अधिक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी पाणी
संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 08 जुलै (हिं.स.) : देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत देशातील निम्म्याहून अधिक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, सिक्कीम, कर्नाटक, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

मध्य भारतात ९ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याशिवाय उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, गुजरात, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि किनारपट्टीवरील कर्नाटक या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.

दिल्लीसह पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 9 जुलैनंतर मध्य भारतातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, गुरुवारपासून पावसाचे प्रमाण घटण्याचा अंदाज आहे.

गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या भागांत 21 सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

तसेच मराठवाडा, सौराष्ट्र-कच्छ, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, कर्नाटकचा किनारी भाग, बिहार, मेघालय आणि त्रिपुरा येथे 12 ते 20 सेंटीमीटरपर्यंत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली.

पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, उत्तर अंतर्गत कर्नाटक तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे 7 ते 11 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार पाऊस झाला.

पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये वाहनचालक पडल्याच्या घटना समोर आल्या असून, काही ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande