
कडप्पा, 09 जुलै (हिं.स.) : आंध्रप्रदेशच्या कडप्पा येथे कोविड-19 मुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 4 दिवस अँटिबायोटिक औषधांनी उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेरीस त्याच्या दोन्ही फुफ्फुसांचे गंभीर नुकसान झाल्याने त्याचा मृत्यू झाला.कडप्पा जिल्ह्याचे वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. रवी बाबू यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
यासंदर्भात डॉ. रवी बाबू यांनी सांगितले की, मृत व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन होते. श्वास घेण्यास तीव्र त्रास आणि सतत खोकला होत असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कडप्पाच्या मसापेटा येथील 46 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 संसर्गामुळे मृत्यू झाला. एक्स-रे तपासणीत त्याच्या दोन्ही फुफ्फुसांचे गंभीर नुकसान झाल्याचे आढळले होते. त्यामुळे त्याला न्यूमोनियाही झाला होता. त्याच्यावर तब्बल 4 दिवस अँटिबायोटिक उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आला आणि त्यातून कोरोना संसर्गाची पुष्टी झाली. या घटनेनंतर कडप्पा आणि तिरुपती जिल्ह्यांमध्ये आणखी 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने (डीएमई) सर्व सरकारी रुग्णालयांकडून आयसोलेशन बेड, अतिदक्षता विभाग (आयसीयू) बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांचा साठा, रॅपिड टेस्ट किट, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा तपशील मागवला आहे.
भारतामध्ये अधिकृत आकडेवारीनुसार 2022 च्या अखेरीपर्यंत कोरोना साथरोगामुळे सुमारे 5.3 लाख मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अंदाजानुसार भारतात महामारीमुळे सुमारे 47 लाख लोकांचा मृत्यू झाला असावा.जगभरात 2022 च्या अखेरीपर्यंत अधिकृतपणे सुमारे 66 ते 67 लाख कोविड मृत्यूंची नोंद झाली होती.
आतापर्यंत कोरोना विषाणूचे हजारो प्रकार (व्हेरियंट) समोर आले आहेत. त्यापैकी जागतिक आरोग्य संघटनेने अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमिक्रॉन या प्रमुख प्रकारांना विशेष श्रेणीत समाविष्ट केले आहे. ओमिक्रॉनचेही कालांतराने जेएन-1, एक्सएफजी आणि एनबी.1.8.1 यांसारखे अनेक उपप्रकार (सब-व्हेरियंट) समोर आले आहेत.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी