गलवान घटनेनंतर सरकारची चीनबाबत नरमाईची भूमिका: मल्लिकार्जुन खर्गे
नवी दिल्ली, ९ जुलै (हिं.स.)काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर चीनबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. गलवान संघर्षाला सहा वर्षे उलटूनही अर्थव्यवस्थेच्या अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताचे चीन
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे


नवी दिल्ली, ९ जुलै (हिं.स.)काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर चीनबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. गलवान संघर्षाला सहा वर्षे उलटूनही अर्थव्यवस्थेच्या अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताचे चीनवरील अवलंबित्व सातत्याने वाढले आहे, असे ते म्हणाले. यामुळे देशाच्या राष्ट्रीय हिताला हानी पोहोचली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, गलवानमध्ये २० भारतीय जवानांच्या बलिदानानंतर पंतप्रधानांनी चीनला 'क्लीन चिट' दिली आहे. भारतीय जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, परंतु केंद्र सरकारने भारताच्या हितांपुढे शरणागती पत्करली, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, गलवान घटनेनंतर चीनकडून भारताची आयात १०१.८१ टक्क्यांनी वाढली आणि २०२५-२६ पर्यंत व्यापार तूट ११२.१ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. त्यांनी दावा केला की, भारताची ८६ टक्के अँटिबायोटिक आयात चीनमधून होते, तर एपीआय, बल्क ड्रग आणि ड्रग इंटरमीडिएटच्या आयातीतही चीनचा वाटा अंदाजे ७४ टक्के आहे.

खर्गे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात, भारताचे ६६ टक्के ईव्ही घटक चीनमधून येतात. शिवाय, भारतीय ईव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरींपैकी अंदाजे ७५ टक्के आयात केल्या जातात आणि त्यापैकी बहुतांश चीनमधून येतात. २०२५-२६ मध्ये, भारताने ९३ टक्के कायमस्वरूपी चुंबक चीनमधून आयात केले.

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, सौर ऊर्जा क्षेत्रात, २०२५-२६ मध्ये भारताची ९९ टक्क्यांहून अधिक अनडिफर्ड सिलिकॉन वेफर आयात चीनमधून झाली. आत्मनिर्भर भारताची भाषा करणारे सरकार सौर ऊर्जा क्षेत्रातही चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

सरकारी वीज प्रकल्पांसाठी चार चिनी कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी देऊन केंद्र सरकारने चीनसाठी नवीन संधी निर्माण केल्याचा आरोप खर्गे यांनी केला. ते म्हणाले की, नागरी समाजाच्या अहवालानुसार, चीन अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहे.

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या कारवायांमध्ये चीनच्या भूमिकेचा उल्लेख लष्कराच्या उपप्रमुखांनी केला होता आणि त्याची अधिकृत नोंद आहे. गलवाननंतर केंद्र सरकारच्या धोरणांमुळे चीनने भारताच्या अनेक महत्त्वाच्या भागांवर आपली पकड मजबूत केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande