मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे सलग 4 धक्के
नांदेड, हिंगोली आणि परभणीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नांदेड, 09 जुलै (हिं.स.) : राज्याच्या मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सलग 4 धक्के जाणवले. रात्री 1.37 ते 3.23 या कालावधीत हे धक्के
भूकंप लोगो


नांदेड, हिंगोली आणि परभणीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड, 09 जुलै (हिं.स.) : राज्याच्या मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सलग 4 धक्के जाणवले. रात्री 1.37 ते 3.23 या कालावधीत हे धक्के बसले असून, रिक्टर स्केलवर त्यांची तीव्रता 3.6 ते 4.6 दरम्यान नोंदविण्यात आली. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, पहिला धक्का रात्री 1.37 वाजता सिरली–पांगरा शिंदे गावाजवळ जाणवला. या धक्क्यामुळे नागरिकांची झोपमोड झाली आणि भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर रात्री 2.15 वाजता ककडधाबा गावाजवळ दुसरा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 3.6 इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी, 2.17 वाजता तिसरा आणि 3.23 वाजता चौथा धक्का जाणवला. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन तासांच्या आत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले.

यापूर्वी याच वर्षी एप्रिल महिन्यात हिंगोली परिसरात 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी पांगरा शिंदे गावातील काही घरे आणि सामुदायिक सभागृहाला तडे गेले होते. तसेच नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर आणि परभणी परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande