
पुणे, 09 जुलै (हिं.स.)।
मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आणखी सहा जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गेल्या २२ तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल, पोलिस, महापालिका प्रशासन तसेच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून, समन्वयाने बचावकार्य सुरू आहे.
मोशी कचरा डेपोमध्ये शहरातील घनकचरा अनेक वर्षांपासून साठवला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे मोठे ढिगारे तयार झाले आहेत. याच ठिकाणी ‘अँटनी लॉरा’ कंपनीकडून कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू असून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत पार्किंगसह दुमजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा इमारतीवर कोसळला आणि इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली.
बचावकार्यात अडकलेल्या व्यक्तींना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी अत्यंत सावधगिरीने काम सुरू असल्याचे एनडीआरएफने सांगितले. मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर केल्यास संपूर्ण इमारत आणखी कोसळण्याचा धोका असल्याने बचाव पथकाने ब्रेकरच्या साहाय्याने इमारतीच्या एका बाजूला भोक पाडून आत प्रवेश केला आहे. इमारतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत असून, अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु