
अकोला, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या निंबी मालोकार येथील अमोल गजानन मालोकार या तरुणाची शेतातील रस्त्याच्या कौटुंबिक वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी जलद गतीने तपास करत अवघ्या ९ तासांत ५ आरोपींना जेरबंद केले आहे.
शेतातील रस्त्याच्या कारणावरून मृत अमोल मालोकार यांचा त्यांच्या चुलत भावांशी वाद झाला होता. चुलत भावांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमोल यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. सुरुवातीला अमोल फक्त जखमी झाले होते, परंतु आरोपींनी परत येऊन पुन्हा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. मुख्य आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक तपासात त्याचा बनाव उघड झाला. आरोपींकडून पळून जाण्यासाठी वापरलेली वाहने (स्विफ्ट डिझायर, अर्टिगा आणि बुलेट), ५ मोबाईल, दैनंदिन वापराचे साहित्य आणि ₹१ लाख ०७ हजार ७६०/- रोख रक्कम जप्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींवर बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे