भारतासोबत संबंध स्थिर करण्यासाठी बांगलादेशचे प्रयत्न
ढाका , 10 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, सत्तेतून हटवण्यात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावर त्यां
भारतासोबत संबंध स्थिर करण्यासाठी बांगलादेशचे प्रयत्न


ढाका , 10 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, सत्तेतून हटवण्यात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावर त्यांनी भारताकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान तारिक रहमान यांनी सोमवारी बांगलादेशातील भारताचे नवे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर दिला.त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सध्या बांगलादेशचे सहा महिन्यांचे सरकार देशाचा सर्वात मोठा शेजारी असलेल्या भारतासोबतचे संबंध स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांना सत्तेतून हटवण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रहमान यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, ढाक्याने नवी दिल्लीकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली आहे.

सरकार पडल्यानंतर शेख हसीना भारतात राहत आहेत. त्यांच्याविरोधात बांगलादेशात कायदेशीर कारवाई सुरू असून, नोव्हेंबरमध्ये त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

शेख हसीना अलीकडेच सार्वजनिकरित्या समोर आल्यानंतर त्यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांनी एका ऑनलाइन ऑडिओ कॉन्फरन्सला संबोधित केले. बांगलादेश सोडल्यानंतर माध्यमांशी झालेला हा त्यांचा पहिलाच संवाद होता. यावेळी त्यांनी डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार असल्याचे सांगितले.हसीना यांच्या या वक्तव्यानंतर भारतातील त्यांच्या उपस्थितीबरोबरच त्यांच्या राजकीय हालचालींकडेही पुन्हा लक्ष वेधले गेले. यावर बांगलादेशकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

शेख हसीना यांना कार्यक्रमाला संबोधित करण्याची परवानगी दिल्याबद्दल बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर टीका केली. भारताचा हा निर्णय अत्यंत खेदजनक असल्याचे सांगत बांगलादेशने नाराजी व्यक्त केली.भारताने मात्र स्पष्ट केले की, ढाक्याकडून करण्यात आलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीचा आपल्या कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रियेनुसार आढावा घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande