
बीजिंग, 12 ऑगस्ट (हिं.स.)।चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले आहे. झू रोंगजी यांनीच चीनला जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) सहभागी करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच चीनच्या आर्थिक विकासाला वेग देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, झू रोंगजी यांचे बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता बीजिंगमध्ये आजारपणामुळे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, १९९०च्या दशकात झू रोंगजी यांनी सरकारी उद्योगांमध्ये मोठ्या आणि कठीण स्वरूपाच्या सुधारणा केल्या. तसेच चीनला जागतिक व्यापार संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. या निर्णयांमुळे चीनमध्ये अभूतपूर्व आर्थिक विकासाची सुरुवात झाली.झू रोंगजी यांना एकेकाळी इतर कम्युनिस्ट देशांमधील सुधारणांचे कौतुक केल्यामुळे ग्रामीण भागात निर्वासित करण्यात आले होते आणि शारीरिक श्रम करण्यास भाग पाडण्यात आले होते. मात्र, पुढे १९९८ ते २००३ या काळात चीनचे पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.
चीनचे माजी नेते देंग शियाओपिंग यांनी १९७९ मध्ये सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांना पुढे नेण्याचे श्रेय झू रोंगजी यांनाही दिले जाते. चीनला डब्ल्यूटीओचे सदस्यत्व मिळवून देण्यासह अनेक ऐतिहासिक बदलांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या सुधारणांमुळे चीनला जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश बनण्यास मोठी मदत झाली.या आर्थिक सुधारणांमुळे २००० ते २०१० या कालावधीत चीनचा आर्थिक विकास दर दरवर्षी ८ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला. २००७ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर तब्बल १४.२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
१९९८ मध्ये वयाच्या ६९व्या वर्षी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या झू रोंगजी यांनी सरकारी गैरव्यवस्था आणि भ्रष्टाचारावर कठोर टीका केली. तसेच सरकारच्या अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारल्यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यांच्या कठोर आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांना ‘बॉस’ तसेच ‘झू फेंगजी’ म्हणजेच ‘वेडा झू’ अशा टोपणनावांनीही ओळखले जात होते.
दरम्यान, गेल्या महिन्यात चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंताजनक बातमी समोर आली होती. चीनची आर्थिक वाढ तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे सांगण्यात आले होते. निर्यातीत वाढ होत असली तरी चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode