
इस्लामाबाद, 12 ऑगस्ट (हिं.स.)। पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस. खान यांनी इमरान खान यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला.त्यानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने मंगळवारी म्हटले की, पक्षाचे संस्थापक इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने समोर येत असलेल्या “चिंताजनक बातम्यांमुळे” संपूर्ण देशात अस्वस्थता आणि घबराट निर्माण झाली आहे. पक्षाने सरकारकडे इमरान खान यांची भेट घेण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
पीटीआयIच्या केंद्रीय मीडिया विभागाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने समोर येणाऱ्या “चिंताजनक बातम्यांमुळे” “संपूर्ण देशात तीव्र चिंता आणि अस्वस्थता” निर्माण झाली आहे. पीटीआय च्या निवेदनात म्हटले आहे की, “सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे की इमरान खान हे कोणतेही सामान्य राजकीय कार्यकर्ते नसून, लाखो पाकिस्तानी नागरिकांनी निवडलेले आणि लोकप्रिय राजकीय नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत जनतेला विश्वासात घेणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
इमरान खान हे देशातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती आणि सुरक्षितता ही “लाखो पाकिस्तानी नागरिकांच्या चिंता आणि भावनांशी थेट जोडलेली आहे,” असेही पक्षाने म्हटले आहे.इमरान खान यांच्या प्रकृतीबाबतची अनिश्चितता आणखी लांबवता येणार नाही आणि हे “मान्य केले जाणार नाही,” असे पीटीआयIने स्पष्ट केले.
पक्षाने सरकारकडे तातडीने इमरान खान यांची त्यांच्या कुटुंबीयांसोबत, खासगी डॉक्टरांसोबत, वकिलांसोबत आणि पक्षातील जबाबदार राजकीय नेत्यांसोबत भेट घडवून आणण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी आणि उपचार त्यांच्या खासगी डॉक्टरांच्या देखरेखीखाली, कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि “पूर्ण पारदर्शकतेने” करण्यात यावेत, अशीही मागणी पक्षाने केली आहे.
इमरान खान यांच्या पक्षाचा हा इशारा पत्रकार वजाहत सईद खान यांच्या त्या वृत्तानंतर आला आहे, ज्यात इमरान खान यांचा कोठडीतच कथित मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. इमरान यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांना भेटता येत नसल्यामुळे आधीपासूनच चिंता व्यक्त केली जात होती. या वृत्तामुळे पक्षाचे समर्थक आणि चाहत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.इमरान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. सध्या ते 190 दशलक्ष पौंडांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तसेच 9 मे 2023 रोजी झालेल्या आंदोलनांशी संबंधित दहशतवादविरोधी कायद्यांतर्गतही त्यांच्यावर खटले सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode